Chikhali News : दिवाळीच्या कालावधीत चिखली-कुदळवाडीत अग्निशमन वाहन तैनात करा – दिनेश यादव  

एमपीसीन्यूज :  दिपावली काळात चिखली, कुदळवाडी भागात आगीच्या घटना  घडण्याची शक्यता असल्याने या भागात  अग्निशमन दलाने एक वाहन गस्तीवर तैनात ठेवावे, अशी मागणी  महापालिका स्वीकृत  सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी अग्निशमन दलाचे अधिकारी उदय वानखेडे यांना निवेदन दिले. त्यावर वानखेडे यांनी  उचित कार्यवाही करण्याचे  आश्वासन यादव यांना  दिले.

चिखली,कुदळवाडी भागात स्क्रॅप व्यावसायिक आणि प्लास्टिक तसेच ज्वलनशील वस्तूंचे उत्पादन होते. दरवर्षी सर्वाधिक आगीच्या घटना घडत असलेला हा पट्टा संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो. या भागात  आगीच्या दुर्घटना घडून   लाखो, कोट्यवधी रुपयांचे  नुकसान झाले तसेच  जीवितहानी घडल्याचे प्रकार नित्याची बाब आहे.

दिपावली काळात फटाके आणि  ज्वलनशील पदार्थ हे प्लास्टिक, स्क्रॅप आदींच्या संपर्कात येऊन आग लागण्याची शक्यता सर्वाधिक आहे.  त्यामुळे खबरदारी घेत अग्निशमन दलाने एक वाहन या भागात गस्तीवर ठेवल्यास अशा घटनांवर त्वरित ताबा मिळविणे शक्य होणार आहे.

आग लागल्यानंतर काही सेकंदात ती  उग्र स्वरूप धारण करते. त्यामुळे अग्निशमनच्या  गाड्या येणे व आगीवर नियंत्रण मिळविण्याची प्रत्यक्ष कार्यवाही यात   वेळ जातो.

यामुळे प्रसंगी  नागरिकांच्या  जीवितास धोका होऊ शकतो. तो होऊ नये व आगीवर त्वरित नियंत्रण मिळावे यासाठी या भागात दीपावलीच्या  काळात   अग्निशमन दलाचे वाहन तैनात असणे गरजेचे असल्याचे  दिनेश यादव यांनी निवेदनात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.