Chikhali News : वटपौर्णिमेनिमित्त महिलांसाठी वडाच्या रोपांचे वाटप; ऑनलाईन उखाणे स्पर्धा

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणे यंदाही महिलांना वटपौर्णिमेचा सण घरी राहूनच साजरा करावा लागणार आहे. त्यासाठी स्व. सौ. अलकाताई यादव प्रतिष्ठाण आणि जय भवानी प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली गावठाण येथे महिलांसाठी ऑनलाईन उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच वडाच्या झाडाभोवती होणारी गर्दी टाळण्यासाठी गावातील सोसायट्यांमध्ये महिलांसाठी वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

स्व. सौ. अलकाताई यादव प्रतिष्ठाणच्या प्रमुख शीतल यादव यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सध्या कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लागू आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी कोरोना संकटात महिलांचा वटपौर्णिमा हा सण आज , गुरुवारी साधेपणाने साजरा होत आहे.

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाजवळ होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने चिखली गावठाण भागातील प्रत्येक सोसायटीत   वडाचे एक मोठे रोपटे वाटप करण्यात आले. यामुळे महिलांना आपापल्या सोसायटीत वडाच्या झाडाचे पूजन करणे शक्य होणार आहे.

तसेच महिलांसाठी यावर्षी ऑनलाईन उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी उद्या वटपौर्णिमेदिवशी पारंपरिक वेशभूषेत उखाणे म्हणतानाचा स्वतःचा व्हिडिओ शूट करून तो @jitendrayadav0909 या इंस्टाग्राम अकाउंटला मेंशन करावा. या स्पर्धेतील तीन विजेत्या महिलांना आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेचा निकाल 26 जूनला दुपारी 12 वाजता @jitendrayadav0909 या इंस्टाग्राम अकाउंटवर जाहीर करण्यात येणार आहे.

महिलांसाठी वटपौर्णिमा हा सण अतिशय महत्वाचा आहे. दोन वर्षांपूर्वींपर्यंत सर्व माहिला एकत्र मिळून वाडाच्या झाडाची पूजा करायच्या. पतीच्या आयुष्यासाठी व सात जन्मी हाच पती मिळो अशी प्रार्थना करीत होत्या. एकत्र येऊन गप्पा गोष्टी, उखाणे म्हणत फुगड्या खेळायच्या, पण मागील वर्षी कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. याही वर्षी कोरोनाची भीती आहेच. अशा परिस्थितीत महिलांसाठी ऑनलाईन उखाणे स्पर्धा आयोजित केली आहे. शीतल जितेंद्र यादव : स्पर्धा आयोजक.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.