Chikhali News : राष्ट्रीय महिला कबड्डीपटूला यश साने यांच्याकडून आर्थिक मदत

एमपीसीन्यूज : राष्ट्रीय स्तरावरील कब्बडी स्पर्धेत जखमी झालेल्या राधा मोरे या महिला कबड्डीपटूला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने यांच्यावतीने आर्थिक मदत करण्यात आली. दत्ता काका साने स्पोर्ट्स फाऊंडेशच्यावतीने रोख स्वरूपात ही मदत देण्यात आली.

राधा मोरे या 2019 मधील 45  व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कब्बडी स्पर्धेत कनिष्ठ गटातील मुलींच्या संघातून खेळत होत्या. कोलकाता येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. खेळताना त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे 19  जुलै 2019  रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी 1 लाख 35  हजार रुपये इतका खर्च आला.

भोसरी येथील गरीब कुटुंबातील  राधा मोरे  यांचे  पितृ छत्र हरपले आहे. तर आई कंत्राटी तत्वावर हाऊस किपिंगचे काम करते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांनी नातेवाईक आणि परिचयाच्या व्यक्तींकडून वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या खर्चाची तजवीज केली. उसने घेतलेलया 1  लाख 35  हजार रुपयांपैकी आतापर्यंत त्यांनी 85 हजार रुपयांची देणी परत केली आहेत. अजूनही त्यांच्यावर 50  हजार रुपयांचे कर्ज आहे.

दरम्यान, राधा मोरे यांच्या आर्थिक परिस्थिती आणि कर्जाची माहिती मिळताच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने यांनी त्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेला. त्यानुसार आज, शुक्रवारी चिखली-साने चौक येथील स्वर्गीय दत्तकाका साने संपर्क कार्यालयात यश साने यांच्या हस्ते राधा मोरे यांना दहा हजार रुपयांची मदत देण्यात आली.

राधा मोरे यांनी राष्ट्रीय पातळीवरील चार स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्य पातळीवर पाच स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग होत. त्यातील एका स्पर्धेत कनिष्ठ गटातील मुलींच्या संघाचे कर्णधारपद त्यांनी भूषविले. खेलो इंडिया स्पर्धामध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून त्यांनी नऊ बक्षिसे मिळवली आहेत.

कबड्डीत शहर, तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या गुणी कबड्डीपटूची आर्थिक परिस्थिती हलाखीची बनली आहे. त्यामुळे या खेळाडूला मदतीची गरज आहे. दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीतून तिच्यावरील कर्जाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.