Chikhali News : अवैध औद्योगिक भंगार व्यावसायामुळे वायू, जल प्रदूषणात वाढ

इंद्रायणी नदीकाठी भंगार व्यावसायिकांचे माफिया राज, लोकप्रतिनिधी- प्रशासनाचे दुर्लक्ष; स्थानिकांचा आरोप

एमपीसी न्यूज ( प्रमोद यादव )- चिखली मधील प्रभाग क्रमांक दोनमध्ये इंद्रायणी नदीकाठी मोठ्या परिसरात अवैध भंगार व्यावसाय विस्तारला आहे. याठिकाणी औद्योगिक भंगार गोळा केलं जाते, त्यामध्ये धातूमिश्रित कचरा, प्लास्टिक, विविध विषारी ऑईल, रबर, कार्बन मिश्रित पदार्थ, औद्योगिक कचरा आणि इतर गोष्टी याठिकाणी व्यावसायासाठी गोळा केल्या आहेत. यामुळे परिसरात वायू प्रदुषण, जल प्रदुषण यासह आरोग्याच्या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. पालिका, लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार आवाज उठवून देखील याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत.

चिखलीत रिव्हर रेसिडेन्सी गृहनिर्माण सोसायटीच्या पाठीमागे मोठ्या परिसरात पसरलेल्या अवैध औद्योगिक भंगार व्यावसायामुळे नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी जमा करण्यात येणा-या विविध औद्योगिक कच-यातून निर्माण होणारे विषारी वायू आणि पदार्थ यामुळे वायू प्रदुषण होत आहे. रात्रीच्या वेळी प्लास्टिक, रबर, टायर व इतर गोष्टी जाळल्या जातात त्यातून निर्माण होणारा विषारी वायू विविध आरोग्य समस्यांना निमंत्रण देत असल्याची ओरड स्थानिक नागरिक करत आहेत.

या परिसराला प्रत्यक्ष भेट दिली त्यावेळी याठिकाणी कार्बन मिश्रित पदार्थांचे प्रोसेसिंग, प्लास्टिकचे ढिगारे, विलगीकरण, ऑईलचे बॅरल व इतर धातूच्या वस्तूशी निगडित कामं सुरू असल्याचे यावेळी दिसून आले. याठिकाणी औद्योगिक मेटल डस्ट (धातूमिश्रित कचरा) आणून त्यातून मेटल पार्टिकल (कण) वेगळे करतात आणि ते सर्व कण हवेत उडतात. हेच कण श्वासाद्वारे येथील रहिवाशांच्या शरीरात जात असून ही मोठी समस्या असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

याठिकाणी निर्माण होणारा औद्योगिक कचरा आणि विषारी ऑईल सारखे पदार्थ शेजारीच असलेल्या इंद्रायणी नदीत टाकले जात आहे. यामुळे जलप्रदुषण होत असून, जलचर देखील मृत्यूमुखी पडत आहेत. भंगार व्यावयायिकांची दंडेलशाही यामुळे भागातील नागरिक त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यास कचरत असल्याचे मत काही स्थानिकांनी नोंदवले.

तरीही याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदुषण मंडळ तसेच पंतप्रधानांना देखील निवेदनं दिली. पालिकेचे अधिकारी तात्पुरती कारवाई करतात त्याचा काहीच उपयोग होत नाही. परत, ही कामं तशीच सुरूच राहतात असे स्थानिक रहिवासी म्हणाले.

याबाबत प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक माजी महापौर राहुल जाधव   म्हणाले, ‘याबाबत निवेदन मिळाल्यानंतर दोन तीन वेळा कारवाई करण्यात आली. हळुहळू हा परिसर कमी करण्याचे काम सुरू आहे. पूर्वापार व्यवसाय असल्याने याला थोडा वेळ लागेल. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) स्थानिकांच्या विरोधामुळे थांबवण्यात आला. आगामी काळात दुस-या ठिकाणी हा प्रकल्प उभारला जाईल असे ते म्हणाले’.

महापालिका पर्यावरण विभागाचे कार्यकरी अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, ‘महापालिकेकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याची दखल घेतली जाते, तक्रारी नुसार कारवाई केली जाते. कचरा जाळणा-यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत’.

दरम्यान, अनधिकृत व्यावसाय बोकाळला असून प्रदुषणामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.