Chikhali News : टाटा मोटर्स आणि टाटा पॉवरतर्फे कार प्लांटमध्ये भारतातील सर्वात मोठे सौर कारपोर्ट सुरु

एमपीसी न्यूज- पर्यावरणस्नेही उत्पादन करण्याच्या टाटा समूहाच्या सिद्धांताचे पालन करत टाटा मोटर्स आणि टाटा पॉवर यांनी मिळून भारतातील सर्वात मोठे ग्रीड-सिंक्रोनाइज्ड, बिहाइंड-द-मीटर कारपोर्ट सुरु केले आहे. पुण्यातील चिखलीमधील टाटा मोटर्सच्या कार प्लांटमध्ये हे सौर कारपोर्ट तयार करण्यात आले आहे. टाटा पॉवरने तयार केलेल्या या 6.2 एमडब्ल्यूपी क्षमतेच्या सौर कारपोर्टमध्ये दर वर्षी 86.4 लाख केडब्ल्यूएच वीज तयार केली जाईल. यामुळे दर वर्षी सात हजार टन आणि संपूर्ण कार्यकालावधीत 1.6 लाख टन कार्बन उत्सर्जन रोखण्यात मदत मिळेल, असा अंदाज आहे.

तीस हजार चौरस मीटर्स क्षेत्र असलेल्या या कारपोर्टमध्ये हरित ऊर्जा निर्मितीसह प्लांटमध्ये बनून तयार असलेल्या गाड्यांसाठी कव्हर्ड पार्किंगसाठी देखील याचा उपयोग केला जाईल. 2039 पर्यंत कार्बन उत्सर्जनाचे निव्वळ प्रमाण शून्यापर्यंत कमी करण्याच्या आपल्या उद्धिष्टाचा एक भाग म्हणून टाटा मोटर्सने 31 ऑगस्ट 2020 रोजी टाटा पॉवरसोबत वीज खरेदी करार (पीपीए) केला. कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीत देखील टाटा मोटर्स आणि टाटा पॉवर या दोन्ही कंपन्यांनी हे विशाल कारपोर्ट फक्त साडेनऊ महिन्यांच्या विक्रमी कालावधीत यशस्वीपणे विकसित केले.

कारपोर्टच्या उद्घाटन प्रसंगी टाटा मोटर्सचे पॅसेंजर वेहिकल बिझनेस युनिटचे प्रेसिडेंट शैलेश चंद्रा म्हणाले, टाटा मोटर्समध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत सुविधा प्रदान करत आमच्या कामांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामात घट करण्यासाठी आणि अधिक सार्थक पद्धती अंमलात आणण्यासाठी व्यवसायाच्या प्रत्येक पैलूमध्ये स्थिरता आणि मजबुती आणली आहे.

उर्जा संवर्धनाप्रती आम्ही नेहमीच जागरूक असतो आणि आमच्या सर्व कामांमध्ये 100 टक्के शुद्ध ऊर्जा स्रोतांचा वापर करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. पुण्यातील आमच्या कार प्लांटमध्ये भारतातील सर्वात मोठ्या सोलर कारपोर्टच्या उभारणीसाठी टाटा पॉवरसोबत आमची भागीदारी त्याच दिशेने उचलण्यात आलेले पुढचे पाऊल आहे.

टाटा पॉवरचे सीईओ आणि एमडी डॉ. प्रवीर सिन्हा म्हणाले, वन टाटा उपक्रमांतर्गत टाटा मोटर्ससोबत भारतातील सर्वात मोठे सौर कारपोर्ट सुरु करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. आमची ही भागीदारी कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या सामूहिक प्रयत्नांचे द्योतक आहे आणि त्यामार्फत आम्ही अभिनव व भविष्यकेंद्री हरित ऊर्जा सुविधा देखील प्रदान करत आहोत. शुद्ध संसाधनांच्या वापराचे नवे मार्ग आम्ही यापुढे देखील शोधत राहू आणि आमच्या भागीदारांना व ग्राहकांना त्यांचे लाभ देत राहू.

आरई100 मधील आपल्या सहभागाला अनुसरून टाटा मोटर्स 100 टक्के शुद्ध उर्जेचा उपयोग करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि आपल्या कामांमध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या अक्षय ऊर्जेच्या प्रमाणात सातत्याने वाढ करत हे उद्धिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने त्यांनी बराच मोठा पल्ला गाठला आहे. आर्थिक वर्ष २०२० मध्ये कंपनीने त्यांच्या एकूण ऊर्जा वापराच्या 21 टक्के म्हणजेच 88.71 मिलियन केडब्ल्यूएच शुद्ध ऊर्जा निर्मिती केली (आर्थिक वर्ष 2019 मधील ऊर्जा वापराच्या तुलनेत 16 टक्के पेक्षा जास्त).

त्यामुळे 72 हजार 739 मेट्रिक टन इतके कार्बन उत्सर्जन रोखण्यात मदत मिळाली. 2030 पर्यंत 100 टक्के शुद्ध ऊर्जा वापराची आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी अक्षय ऊर्जा निर्मितीचे आपले प्रयत्न अधिक जोमाने करण्याची त्यांची योजना आहे.

कितीतरी मोठ्या सौर प्रोजेक्ट्सच्या यशस्वी उभारणीचा अनुभव टाटा पॉवरच्या गाठीशी आहे. एकाच ठिकाणी उभारण्यात आलेले जगातील सर्वात मोठे रुफटॉप – राधास्वामी सत्संग बीस, अमृतसर (16 मेगावॅट), कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ (2.67 मेगावॅट), क्रिकेट क्लब ऑफ इंडिया जगातील सर्वात मोठे सौरऊर्जेवर चालणारे क्रिकेट स्टेडियम (820.8 केडब्ल्यूपी), डेल बंगळुरू येथे उभारण्यात आलेले सोलर व्हर्टिकल फार्म (120 केडब्ल्यू), टाटा केमिकल्स, नेल्लोर येथे 1.4 मेगावॅट क्षमतेचे फ्लोटिंग सोलर आणि असे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प टाटा पॉवरने उभारले आहेत.

त्याचप्रमाणे देशात सर्वत्र लोकांना सौरऊर्जेविषयी जागरूक करण्यासाठी घरांच्या छतांवर सौरऊर्जा रुफटॉप उभारणीचे काम देखील टाटा पॉवर मोठ्या प्रमाणावर करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.