Chikhali News : जिगरबाज शेतकऱ्याने टँकरच्या पाण्यावर केली कांदा लागवड

दोन दिवसांपासून वीज गुल ; पाण्याअभावी कांदा रोपे सुकू लागली होती

एमपीसी न्यूज – सलग दोन दिवस शेती पंपाचा (Agricultural pump) वीज पुरवठा खंडित (cut Of power supply ) झाला होता. पाण्याअभावी कांद्याची (onion) रोपं सुकून जात असल्याने अखेर चिखलीतील (chikhali) एका शेतकऱ्याने (Farmer) टँकरच्या पाण्यावर कांद्याची लागवड केली. बारा हजार लिटर क्षमतेच्या दोन टँकरच्या पाण्यावर त्यांनी अर्धा एकर शेतात कांद्याची लागवड केली. हा परिसर महापालिका हद्दीत येतो. 

केरूभाऊ सातव, असे या प्रगतशील शेतकऱ्यांचे नाव आहे. केरूभाऊ यांचा मुलगा मिथून सातव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधववाडी, चिखलीतील बोल्हाईचा मळा याठिकाणी आम्ही भाजी-पाला व इतर माळव्याचे उत्पादन घेतो. त्याच ठिकाणी एक एकर क्षेत्रात कांद्याची लागवड करण्यासाठी नारायणगाव येथून कांद्याची रोपं विकत आणली.

एक एकर क्षेत्रापैकी जवळपास आर्धा एकर क्षेत्राची लागवड पूर्ण झाली. मात्र, त्यानंतर बुधवार व गुरूवार असे सलग दोन दिवस शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. पाण्याअभावी विकत आणलेली कांद्याची रोपं सुकून जात होती. त्यामुळे शेवटी नाईलाजास्तव टँकरच्या पाण्यावर कांद्याची लागवड करावी लागली.

मिथून सातव पुढे म्हणाले, बारा हजार लिटर क्षमतेच्या दोन टँकरच्या पाण्यावर अर्धा एकर शेतात कांद्याची लागवड केली. दोन टँकरसाठी तीन हजार रूपये मोजावे लागले. सलग दोन दिवस लाईट नव्हती. तसेच कांद्यांची रोपं सुकून गेल्यास पुन्हा नवीन रोपं आणून लागवड करावी लागली असती. त्यामुळे टँकरच्या पाण्यावर कांद्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला.

लागवडीसाठी शेतकरी ज्ञानेश्वर जांभूळकर व प्रतिक मळेकर यांचे सहकार्य मिळाले, असे सातव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.