Chikhali News : जितेंद्र यादव यांची सामाजिक बांधिलकी ! गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘पुस्तक बँक’

एमपीसीन्यूज : कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळे रोजगार गमावलेले व पगार कपात झालेले पालक, तसेच ग्रोगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव आणि शीतल यादव यांच्या पुढाकारातून पुस्तक बँक उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यामध्ये गतवर्षी वापरलेली चांगली पुस्तके गरजू विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांना मोफत वह्या वाटप करण्यात येणार आहेत. या सेवाभावी उपक्रमाच्या माध्यमातून गरीब विद्यार्थी आणि त्यांचा पालकांचा शैक्षणिक खर्च कमी करण्यास हातभार लागणार आहे.

स्वर्गीय अलकाताई यादव प्रतिष्ठान आणि जय भवानी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना जितेंद्र यादव म्हणाले, पुस्तक बँक या उपक्रमात विद्यार्थ्यांची आदल्यावर्षीची शाळेची पाठय़पुस्तके गोळा केली जाणार आहेत, ज्या गरजू मुलांना पुस्तकाची गरज असेल, त्यांच्यापर्यंत ही पुस्तके पोहोचवली जातील. यासाठी पालकांनी किंवा संस्थांनी गरजू विद्यार्थ्यांची नोंदणी केली की त्यांना प्राधान्याने ही पुस्तके दिली जातील. मागणीपेक्षा अधिक पुस्तके जमा झाली तर शाळांकडून माहिती गोळा करून ही पुस्तके संबंधित शाळांना देण्यात येतील.

या उपक्रमात मराठी आणि इंग्रजी माध्यम दोन्हीची पुस्तके गोळा करण्यात येत आहेत. सध्या इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकांना अधिक मागणी आहे. मराठी माध्यमाच्या पुस्तकांनाही मागणी आहे. समाजमाध्यमांवरील संदेशांच्या आधारे या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. चिखलीसह पिंपरी चिंचवड शहरातूनही या उपक्रमाबाबत विचारणा होत आहे.

‘येथे’ करा पुस्तकं जमा

इच्छुकांनी चिखली गावठाणातील लाईफ केअर हॉस्पिटल समोरील महा-ई सेवा केंद्रात पाठ्यपुस्तके जमा करावीत. अधिक माहितीसाठी 9922878794, 9850552323, 9960686861 या क्रमांकावर संपर्क साधावा.

दरवर्षी पाठय़पुस्तकांची रद्दी होत असते. मात्र, हीच रद्दी ज्ञानदानासाठी गरीब विद्यार्थ्यांच्या उपयोगी येणार आहे. कोरोना संकटात  एकमेकांना आधार देणे, मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून हा उपक्रम सुरु आहे. यामध्ये नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जितेंद्र यादव : सामाजिक कार्यकर्ते, चिखली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.