Chikhali News : जितेंद्र यादव यांची सामाजिक बांधिलकी ! कोरोना संकटात सर्वधर्मिय गोरगरिबांसाठी मोफत विवाह  सोहळा 

एमपीसीन्यूज : सध्याच्या कोरोना संकटामुळे सर्वसामान्यांसह हातावर पोट असणाऱ्या गरिबांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक बनली आहे. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सोडविणेही काहींना शक्य होत नाही. या कठीण परिस्थितीत घरातील मुला-मुलींची लग्न कार्य कशी पार पडायची, असा प्रश्न या गोरगरिबांसमोर उभा ठाकला असताना आता या नागरिकांच्या मुला-मुलींच्या विवाहांची जबाबदारी चिखली गावातील जय भवानी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष जितेंद्र यादव आणि त्यांच्या पत्नी शीतल यादव यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे संबंधितांना संकटकाळात मोठा आधार मिळाला आहे.

चिखलातील स्वर्गीय अलकाताई यादव प्रतिष्ठाण आणि जय भवानी प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली गावासह पिंपरी चिंचवड शहरातील गोरगरीब कुटुंबातील मुला-मुलींसाठी मोफत विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे सर्वधर्मियांसाठी हा मोफत विवाह सोहळा होणार आहे. यामध्ये वधू-वरांचा पोशाख, वऱ्हाडी मंडळींसाठी जेवण, संसारोपयोगी साहित्य ( झाल), भटजी व लग्न समारंभासाठी अन्य आवश्यक बाबी मोफत पुरविण्यात येणार आहेत.

हा विवाह समारंभ कोरोनाचे नियम व महापालिका आणि शासन निर्देशांचे पालन करून आयोजित करण्यात येणार आहे. आतापर्यंत सर्वधर्मीय मिळून एकूण आठ विवाहांची नोंद झाली आहे. कोरोना संकट असेपर्यंत ही नोंदणी सुरु राहणार आहे. येत्या 4 जूनला दोन विवाह आयोजित करण्यात आले आहेत. उर्वरित विवाह टप्प्याटप्प्याने आयोजित केले जाणार आहेत.

सध्याची परिस्थिती गोरगरिबांसाठी कसोटीची आहे. लॉकडाऊनमुळे प्रत्येकाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात काही कुटुंबातील मुला-मुलींची लग्न कार्ये ठरली आहेत. मात्र, दोन्ही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने लग्न सोहळा कसा पार पडायचा, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून सर्वधर्मीय मोफत विवाह सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वधर्मीय गोरगरीब नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. जितेंद्र यादव : सामाजिक कार्यकर्ते

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.