Chikhali News : चिखलीत मंगळसूत्र, दिघीत मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून घरी जात असलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना चिखलीत घडली. तर पायी चालत जात असलेल्या तरुणाचा मोबाईल फोन हिसकावल्याची घटना दिघी येथे घडली. याप्रकरणी बुधवारी (दि. 29) चिखली आणि दिघी पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुडडी जमिल खान (वय 45, रा. मोरेवस्ती, चिखली) या मंगळवारी रात्री आठ वाजता दुचाकीवरून त्यांच्या घरी जात होत्या. राधा स्वामी आश्रमासमोर दोन अनोळखी चोरटे दुचाकीवरून खान यांच्या जवळ आले. चोरट्यांनी खान यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून नेले. खान यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
प्रज्वल यादव चोबित्कर (वय 20, रा. डुडुळगाव, ता. हवेली) या तरुणाचा मोबाईल हिसकावला आहे. त्यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रज्वल मंगळवारी रात्री सव्वादहा वाजता डुडुळगाव येथील प्रज्वल हॉटेलसमोर पायी चालत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी प्रज्वल यांचा 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.