Chikhali News : आमदार महेश लांडगे यांच्या शिष्टाईने चिखलीतील अतिक्रमण विरोधी कारवाई स्थगित

एमपीसीन्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्यावतीने चिखली, मोरेवस्ती परिसरातील काही नागरिकांना अतिक्रमण विरोधी कारवाईच्या नोटीसा बजावलया होत्या. त्यामुळे स्थानिक नागरिक कमालीचे हवालदिल झाले. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी या नागरिकांसोबत चर्चा करुन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे तूर्तास कारवाई स्थगित झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

महापालिका अतिक्रमण नियंत्रण विभागाने चिखली, मोरेवस्ती परिसरातील काही नागरिकांना अतिक्रमण कारवाईच्या नोटिसा बजावलया होत्या. या नोटिसा मिळाल्यानंतर आपले राहते घर पडण्याच्या चिंतेने नागरिक कमालीचे हवालदिल झाले. त्यांनी स्थानिक  भाजपचे कार्यकर्ते पांडुरंग साने यांच्याकडे मदतीची याचना केली.

त्यानंतर पांडुरंग साने यांनी तातडीने याबाबत आमदार महेश लांडगे यांना हा सर्व प्रकार सांगितला. आमदार लांडगे यांनीही लागलीच चिखली-मोरे वस्ती परिसरात जाऊन कारवाईच्या नोटिसा मिळालेल्या नागरिकांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी नगरसेवक कुंदन गायकवाड उपस्थित होते.

तसेच या संदर्भात महापालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे संभाव्य कारवाई तूर्तास स्थगित करण्यात आली. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

पांडुरंग साने यांनी नागरिकांच्या भावनांचा विचार करुन थेट आमदार लांडगे यांच्या मदतीने नागरिकांना दिलासा मिळवून दिल्याबद्दल नागरिकांकडून त्यांचे आभार मानण्यात येत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.