Chikhali News : कुदळवाडीतील उद्योजकांना ‘तहसील’कडून दंडाच्या नोटीसा; भाजप युवा मोर्चाकडून निषेध

एमपीसीन्यूज : कुदळवाडी भागातील उद्योजकांना अप्पर पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयाने अकृषिक वापराचे कारण देत बजावलेल्या नोटिसा अन्यायकारक आहेत. त्यामुळे या नोटीसा मागे घेण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस तथा स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे. तसेच या नोटीसांचा त्यांनी निषेध केला आहे.

दरम्यान, महसूल वाढावा म्हणून अशा प्रकारे उद्योजकांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचे मतही उद्योजकांनी व्यक्त केले आहे.

कुदळवाडी भागातील अनेक उद्योजकांना अप्पर पिंपरी चिंचवड तहसीलदार यांनी बांधकाम क्षेत्रफळ आकारणीच्या आधारे अकृषिक जमिनीचा वापर औद्योगिक कारणासाठी केला म्हणून शासन तिजोरीत दंड भरावा, अशा प्रकारच्या नोटीसा बजावल्या आहेत.

या नोटिसांमुळे उद्योजक धास्तावले असून शनिवारी याबाबत उद्योजक आणि लोकप्रतिनिधी यांनी संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत या नोटीसा परत घेण्याची एकमुखी मागणी उद्योजकांकडून करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

तहसील कार्यालयाकडून चाळीस पट दंड लावल्याने उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इतक्या मोठ्या पटीने दंड आकारणी म्हणजे मोगलाई अवतरली की काय? असा प्रश्न या बैठकीत उपस्थित करण्यात आला.

कुदळवाडी भाग औद्योगिक वसाहत म्हणून ओळखला जात असताना शासन दरबारी कागदी घोडे नाचवून कागदोपत्री अकृषिक असल्याचे कारण दाखवत महसूल आणि तोडपाणीसाठी चाललेल्या या खटाटोपाचा उद्योजकांनी निषेध व्यक्त केला आहे.

या संदर्भात पुढील दिशा लवकरच ठरविण्यात येईल आणि आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर तोडगा निघेल, असा विश्वास स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान,  या संदभार्त अप्पर पिंपरी चिंचवडच्या तहसीलदार गीता गायकवाड यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. ती मिळाल्यास या बातमीत समाविष्ट केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1