Chikhali News : वाढीव वीज बिले कमी करा; यश साने यांची महावितरणकडे मागणी

एमपीसीन्यूज : चिखली, मोरे वस्ती, सानेवस्ती आदी परिसरातील वीज ग्राहकांना वाढीव रकमेची वीज बिले मिळाली आहेत. वीज वापर कमी असतानाही भरमसाठ रकमेची वीज बिले मिळाल्याने सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे वाढीव वीज बिले कमी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते यश साने यांनी महावितरणकडे केली आहे.

या संदर्भात साने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महावितरणच्या भोसरी कार्यालयात निवेदन दिले आहे. यावेळी ऋषिकेश तापकीर, उमाकांत बिरादार, शुभम आहेर, बाळासाहेब राऊत, विजय झरे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीने नागरिक आर्थिक दृष्ट्या कमकुवत झाले आहेत. अनेकांना तर दैनंदिन घर खर्च भागविणे जिकरीचे झाले आहे. तसेच नुकत्याच झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कामगारांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. असंख्य नागरिक बेरोजगार झाले असून त्यांची आर्थिक परिस्थिती दयनीय झाली आहे.

अशा परिस्थितीत चिखली, मोरे वस्ती, साने वस्ती परिसरातील असंख्य वीज ग्राहकांना महावितरणकडून भरमसाठ रकमेची वीज बिले पाठविण्यात आली आहे. हि वाढीव रकमेची वीज बिले भरणे सध्या परिस्थितीत ग्राहकांना अशक्य आहे.

त्यामुळे ग्राहकांना वीज बिलात सवलत देण्यासह वाढीव बिलात कपात करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.