Chikhali News : नवदुर्गा सखी मंचाचे सेवाकार्य ; आरोग्य, सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट व महिलांना छत्री वाटप करणार

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिसानिमित्त सामाजिक उपक्रम :

एमपीसीन्यूज : माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली मोरेवस्ती व प्रभाग क्रमांक एकमधील आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचारी तसेच नवदुर्गा सखी मंचच्या महिला सदस्यांना मोफत छत्री वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक पांडुरंग तथा पांडा साने आणि नवदुर्गा सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा रुपाली साने यांनी दिली.

चिखली -साने चौकाजवळील अंगणवाडी येथील महापालिका शाळेत शुक्रवारी ( दि. 23) दुपारी 12  वाजता हा कार्यक्रम होणार आहे. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, फ प्रभाग समिती अध्यक्ष कुंदन गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते महापालिका आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट तसेच नवदुर्गा सखी मंचच्या महिला सदस्यांना मोफत छत्री वाटप करण्यात येणार आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. या निमित्त उत्सवाप्रमाणे कोणताही कार्यक्रम न करता केवळ सेवाकार्यात योगदान देण्याचा निर्णय भाजपच्या वतीने घेण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पांडुरंग तथा पांडा साने म्हणाले, विरोधीपक्ष नेते फडणवीस यांच्या वाढदिसानिमित्त पक्षाचे कोणतेही नेते / कार्यकर्त्यांनी होर्डिंग, बॅनर लावू नये, उत्सवाप्रमाणे कोणताही कार्यक्रम न करता केवळ सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यानुसार चिखली मोरेवस्ती व प्रभाग क्रमांक एकमधील आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचारी तसेच नवदुर्गा सखी मंचच्या महिला सदस्यांना मोफत छत्री वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना  संकट काळात महापालिकेचे आरोग्य कर्मचारी आणि सफाई कामगारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले आहे. त्यांच्या या कार्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सेवाभावी उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे साने यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.