Chikhali News : घरकुल वसाहतीत पाच सोसायटयांनी उभारला सोलर उर्जा प्रकल्प

मासिक 15 हजारांची होणार बचत

एमपीसी न्यूज – श्रमिकांसाठी महापालिकेच्या वतीने चिखलीत उभारलेल्या घरकुल वसाहतीमधील पाच सोसायट्यांमध्ये सोलर उर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. सीएसआर फंडाअंतर्गत पितांबरी उद्योग, डेटम कंपनी आणि रोटरी कल्ब पुणे यांच्या वतीने हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे प्रत्येक इमारतीची मासिक 15 हजार रूपयांची बचत होणार आहे.

आर्थिक दुर्बल घटकासाठी उभारण्यात आलेल्या या घरकुल वसाहतीमधील सदनिकांसाठी पाण्याची मोटर, लिफ्ट आणि कॅामन पॅसेजमधील लाईट यासाठी दर महिना 15 हजार रूपयांचा खर्च येत होता. यासह इमारतीचा इतर मेंन्टनन्सचा खर्चही होता.

अनेक कुटुंबांना हा खर्च परवडणारा नव्हता. त्यावर घरकुल फेडरेशनचे अध्यक्ष अशोक मगर यांनी पुढाकार घेत घरकुलमधील पाच इमारतींच्या टेरेसवर सोलर प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला.

घरकुल प्रकल्पातील श्री दत्तकृपा हौसिंग सोसायटी ए-17, अलंकापुरी हौसिंग सोसायटी सी -27, सुखशांती हौसिंग सोसायटी बी – 30, साई हौसिंग सोसायटीचे बी-31 आणि माऊली हौसिंग सोसायटी बी-28 या सोसायट्यांवर सौरउर्जा प्रकल्प उभारला आहे.

यातून 10 किलो वॅट वीज निर्माण केली जात असून त्यावर सोसायटीतील लिफ्ट, पाण्याची मोटार, कॅामन लाईट चालत आहे. यामुळे या पाच सोसायटीची वार्षीक 20 लाख रूपयांचे वीज बील वाचणार आहे.

पितांबरी कंपनीचे सीएमडी रविंद्र प्रभुदेसाई, रोटरी क्लबचे किरण इंगळे, प्रकाश अवचट, डेटम कंपनीचे संतोष जोशी व (नि.) मेजर रवींद्र विचारे यांनी यासाठी सहकार्य केले.

नुकतेच या प्रकल्पाला शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी भेट देऊन या प्रकल्पाचे कौतुक केले. घरकुल योजनेतील इमारतीत राबवलेला हा सोलर प्रकल्प इतर सोसायट्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे कोल्हे म्हणाले. यावेळी माजी आमदार विलास लांडे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.