Chikhali News : चिखलातील रोजगार निर्मिती मार्गदर्शन कार्यशाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसीन्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिका, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आणि युवकांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य योजनांची माहिती व्हावी, यासाठी चिखली, मोरेवस्ती येथे आयोजित केलेल्या रोजगार निर्मिती मार्गदर्शन कार्यशाळेला परिसरातील महिला आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार , माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नगरसेविका मंगला कदम यांच्या सहकार्यातून तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने आणि दत्ताकाका साने प्रतिष्ठान यांच्या पुढाकारातून या सावित्रीबाई फुले महापालिका शाळेत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

जेष्ठ नगरसेविका मंगला कदम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर, संघटिका कविता खराडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा वर्षा जगताप, स्वाभिमानी संघर्ष सेनेचे प्रदेशाध्यक्षा भाग्यश्री पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी नितीन बेंद्रे व सारंग बिडकर आदी उपस्थित होते.

यावेळी बेंद्रे आणि बिडकर यांनी रोजगाराच्या दृष्टीने स्वयंपूर्ण बनवण्यासाठी उपस्थित महिला आणि तरुणांना विविध व्यवसायाची माहिती दिली. सध्या उद्योग व्यवसायाच्या उपलब्ध असलेल्या संधी आणि त्यासाठी असलेल्या  शासकीय योजना, प्रोजेक्ट रिपोर्ट आदींची सविस्तर माहितीही यावेळी देण्यात आली.

दरम्यान, कार्यशाळेत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होती. अशा प्रकारची मोफत कार्यशाळा या भागात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती. याबद्दल महिला आणि तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि यश साने यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.