Chikhali News : कुदळवाडीतील बालकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करा : दिनेश यादव

एमपीसीन्यूज : चिखली गावातील कुदळवाडी परिसर आरोग्य सुविधांपासून वंचित आहे. येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना या भागासाठी साधे आरोग्य सुविधा केंद्रही परिसरात नाही. तिसऱ्या कोरोना लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे. त्यामुळे या भागातील बालकांचे तातडीने लसीकरण करण्याची मागणी फ प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे. 

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कुदळवाडीतील मुलांना साधे नियमित रोग प्रतिबंधक लसीकरणही होत नाही. मोफत मिळणाऱ्या या डोससाठी खासगी रुग्णालयात पालकांना मोठी किंमत मोजावी लागते. आरोग्य केंद्रासाठी वारंवार पाठपुरावा करूनही पालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप फ प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केला आहे.

या संदर्भात यादव यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेच्या अंदाजामुळे नागरिक भयभीत आहेत. लहान मुलांसाठी पोलिओ, बीसीजी, पेंटाव्हॅलंट, हिपेटायटिस ‘ए’, गोवर व इतर लसींची गरज असते. मात्र, कुदळवाडीतील लहान मुलांना यापासूनही वंचित ठेवले जात आहे. या डोससाठी खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतोय.

परिसरात औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची संख्या मोठी. पर्यायाने दाट लोकसंख्या व आर्थिक दुर्बल घटकांची संख्याही कुदळवाडीत मोठी आहे. येथे आरोग्य केंद्र नसल्यामुळे कामगार वस्तीतील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी पालिकेच्या चिखली घरकुल, जाधववाडी, संभाजीनगर व आकुर्डी रुग्णालयात जावे लागते.

पालिकेची पर्यायी व्यवस्था नसल्याने अति गंभीर व तातडीच्या वेळी या रुग्णांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे पालिका आयुक्तांनी तिसऱ्या लाटेपुर्वी बालकांना त्वरित डोस देण्याची व्यवस्था करावी. प्रलंबित आरोग्य केंद्र उभारण्यासाठी आवश्यक बाब म्हणून निधी उपलब्ध करून द्यावा, असे यादव यांनी निवेदनात म्हटले आहे.

महापालिका आयुक्तांना निवेदन देताना भाजप युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चौधे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.