Chikhali News : चिखलीत ‘बजरंगी भाईजान’चा प्रत्यय ; हरवलेल्या मुक्या हिंदू चिमुकलीला मुस्लिम महिलेने सुखरूप पालकांकडे केले सुपूर्द

एमपीसी न्यूज (प्रमोद यादव) – भारतात चुकलेल्या मुक्या पाकिस्तानी मुलीला तिच्या आई-वडिलांकडे सोडण्यासाठी सिमेवरील तारे खालून पाकिस्तानला गेलेल्या सलमान खानचा बजरंगी भाईजान चित्रपट सर्वांनी पाहिला आहे. अशीच काहिशी घटना चिखलीत घडली आहे.

रस्ता भटकलेल्या मुक्या हिंदू चिमुकलीला आपल्या मुळ आई-वडिलांपर्यंत पोहचवण्यासाठी 55 वर्षीय मुस्लिम महिलेने आसपासचा परिसर अक्षरश: पायी पालथा घातला. तसेच पोलिसांत तक्रार दिली. दिवसभर तिला काय हवं नको ते पाहिल, तिच्या कपड्यांची व्यवस्था केली, नवीन चप्पल घेतले.

दिवसभर तिला आईची माया दिली. हरवलेल्या मुलीचे पालक पोलिसांत तक्रार देण्यासाठी आले. पोलिसांनी या महिलेला संपर्क करून चिमुकलीला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. रस्ता चुकलेली चिमुकली आई-वडिलांना पाहताच आनंदाने त्यांना बिलगली.

नजीमाँ वाजिद्दीन अन्सारी, असे 55 वर्षीय मुस्लिम महिलेचे नाव आहे. घडले असे की, नजीमाँ अन्सारी यांना मंगळवारी (दि.15) दुपारी बारा वाजताच्या सुमारास चिखली, पाटीलनगर परिसरात राम मंदिर जवळ एक पाच ते सहा वर्षाची चिमुकली ‘शिवानी’ दिसली.

वाहनांच्या वर्दळीत अनवाणी पायांनी ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. नजीमाँ यांनी तिला जवळ घेऊन विचारपूस केली. मात्र, जन्मत: मुकी असलेली शिवानी काहिच बोलली नाही. नजीमाँ यांनी शिवानीला घेऊन आजूबाजूला चौकशी केली पण कुणीच आम्ही मुलीला ओळखतो, असे सांगितले नाही.

वयानं लहान आणि बोलता येत नसल्याने मुलीला तिच्या पालकांपर्यंत पोहचवायचे कसे, असा प्रश्न नजीमाँ यांच्या समोर उभा राहिला होता. नावातच ‘माँ’ असलेल्या नजीमाँ यांनी शिवानीला आपल्या घऱी नेले.

तिला अंघोळ घातली, पोटभर खायाला दिले, तिच्या कपड्यांची व्यवस्था केली तसेच तिला नवीन चप्पल देखील खरेदी करून दिले.

शिवानीला तिच्या पालकापर्यंत पोहचवण्याचा विचार नजीमाँ यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांनी शिवानीला सोबत सगळा पाटीलनगर परिसर पालथा घातला.चौकातील ट्रॅफिक पोलीसांकडे चौकशी करून देखील काही खबर लागली नाही.

नजीमाँ यांनी सामाजिक कार्यकर्ते विनायक मोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांना याबाबत माहिती दिली. मोरे यांनी कुदळवाडी पोलीस चौकीत संपर्क करून यासंबधित काही तक्रार आल्याची चौकशी केली. पोलीसांनी तक्रार आली  नसल्याची माहिती दिली. नजीमाँ यांना शिवानीचे पालक सापडतील, अशी आशा होती.

दरम्यान, सायंकाळी सात वाजता एक इसम लहान मुलगी हरवल्याची तक्रार घेऊन कुदळवाडी पोलीस चौकीत आला.

पोलिसांनी विनायक मोरे यांना संपर्क करून मुलीची ओळख पटवण्यासाठी शिवानीला कुदळवाडी पोलीस चौकीत घेऊन येण्यास सांगितले. चौकीत आपल्या आई वडिलांना पाहिल्यानंतर चिमुकली शिवानी आईच्या कुशीत शिरली.

यावेळी उपस्थित पोलीस उपनिरीक्षक एस. पी.  देशमुख यांनी नसीमाँ यांच्या मातृत्वाचे कौतुक केले.  तसेच विनायक मोरे यांचेही अभिनंदन केले. वैभव बनसोडे, अमोल जाधव, खंडू डांगे, मयुर सांडभोर यावेळी उपस्थित होते.

पोटच्या गोळ्याची पुन्हा भेट झाल्याने शिवानीची आई किसलावंती प्रजापती यांना अश्रू अनावर झाले. नावातच ‘माँ’ असलेल्या नजीमाँ यांनी आपल्या मातृत्वाचे अनोखे दर्शन घडवले आहे.

धर्म, जात याच्या पलीकडे फक्त माणुसकी हि एकमेव जिवंत राहते. निःस्वार्थ केलेल्या मदतीचे समाधान चिरकाळ टिकणारे असते हेच त्यांनी आपल्या कृतीतून दर्शवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.