Chikhali News : समाविष्ट गावांना नोव्हेंबरअखेर आंद्राचे पाणी मिळणार; प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर

पदाधिकारी, अधिका-यांकडून चिखलीतील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाचे काम वेगात सुरु आहे. तळवडेतील जॅकवेलचे कामही युद्धपातळीवर सुरु आहे. चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. प्रकल्प पूर्णत्वाचे दिशेने जात असून पहिल्या टप्प्यात आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. नोव्हेंबरअखेर समाविष्ट गावांतील लोकांना आंद्रा धरणाचे पाणी मिळेल, असा विश्वास उपमहापौर हिराबाई घुले यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन आंद्रा व भामा आसखेड धरणातून शहरात पाणी आणण्यात येणार आहे. सुरुवातीला आंद्रा धरणाचे पाणी मिळणार आहे. पालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या चिखलीतील जलशुध्दीकरण केंद्राच्या कामाची उपमहापौर हिराबाई घुले यांनी आज (शुक्रवारी) पाहणी केली.

काम वेगात पूर्ण करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या. कामाची प्रगती पाहून नोव्हेंबरअखेर आंद्राचे पाणी उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी उपमहापौर केशव घोळवे, नगरसेविका साधना मळेकर, नगरसेवक कुंदन गायकवाड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून पाणी कोटा आरक्षित आहे. अशुद्ध जलउपसा करण्यासाठी धरणापासून नवलाख उंब्रे येथील नियोजित ब्रेक प्रेशर टँक पर्यंत 1700 मि.मी व्यासाची उदंचन नलिका (पंपिग मेन) टाकण्यात येत आहे. तळवडे येथील गट क्रमांक 380 पैकी इंद्रायणी नदी लगतच 4 हजार चौरस मीटरचा भूखंड खासगी कंपनीकडून घेण्यात आला आहे. त्या जागेवर जॅकवेलचे काम काम वेगात सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.