
chikhali News : शिवांजली सखी मंचच्या हळदी कुंकू समारंभाला महिलांचा उदंड प्रतिसाद

एमपीसीन्यूज : शिवांजली सखी मंचच्यावतीने चिखली परिसरात आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभाला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. मोरे वस्ती येथे आज, बुधवारी सायंकाळी हा सोहळा पार पडला. या वेळी महिलांना वाण म्हणून संसरोपयोगी साहित्य देण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचे युवा नेते पांडुरंग साने आणि नवदुर्गा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रुपाली साने यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
शिवांजली सखी मंचाच्या संस्थापक अध्यक्षा पूजा महेश लांडगे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. रुपाली साने, नंदा साने, इंदुबाई साने, रंजना साने, प्रभावती साने, सुलभा साने, चांगुना साने, सुलोचना साने, ग्रामपंचायत सदस्या सुवर्ण आसवले आदींच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

त्यानंतर पूजा लांडगे यांच्या हस्ते महिलांना वाण वाटप करण्यात आले. तत्पूर्वी उखाणे, प्रश्न मंजुषा, गायन आदी स्पर्धाही घेण्यात आली. त्यात सर्व वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महिलांनी विविध कलागुण सादर केले. त्यात जेष्ठ महिला आणि नव विवाहित महिलांच्या उखाण्यांनी रंगत आणली. उपस्थित महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
मोरेवस्ती येथील पांडाभाऊ साने जनसंपर्क कार्यालय येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या ठिकाणी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिलांमधील स्नेह आणि गोडवा कायमचा टिकावा, या उद्देशाने तिळगुळ वाटप आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासाठी आमदार महेश लांडगे आणि शिवांजली सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष पूजा लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले. शिवांजली मंच महिलांच्या उत्कर्षासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवित असतो. तसेच या उपक्रमांचा संख्या महिलांना लाभ होत असल्याची माहिती नवदुर्गा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रुपाली साने यांनी यावेळी दिली.
