Chikhali News : यश साने यांच्या प्रयत्नातून मोरेवस्ती येथील पाणीसमस्या निकाली

एमपीसीन्यूज : चिखली- मोरेवस्ती येथील कृष्णाई हौसिंग सोसायटी, ओंकार हौसिंग सोसायटी व कन्हैया हौसिंग सोसायटी या तीन सोसायट्यांमध्ये गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे या सोसायट्यांमधील गृहिणींना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना तर पाणीच मिळत नव्हते. त्यांना तळमजल्यावर येऊन पाणी भरावे लागत होते. त्यामुळे नागरिक पाण्यासाठी कमालीचे त्रस्त झाले होते.

ज्या कुटुंबातील पती -पत्नी नोकरी करणारे आहेत, त्यांच्यासाठी पाण्याची समस्या अतिशय गंभीर बनली होती. त्यांना इतरांकडून पाणी घ्यावे लागत होते. एकूणच कधी नव्हे अशी ‘पाणीबाणी’ या भागातील नागरिक अनुभवत होते.

या भागाचे अनेक वर्ष प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक दत्ताकाका साने यांचे कोरोनामुळे गेल्या वर्षी जुलैमध्ये निधन झाले . त्यामुळे स्थानिक नागरिकांना आपल्या समस्या कुणाकडे मांडायच्या, असा प्रश्न पडला होता.

दरम्यान, दत्ता साने यांचे चिरंजीव व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने यांच्या कानावर या पाणी समस्येची माहिती पोहोचली. त्यांनीही तातडीने संबंधित तिन्ही सोसायट्यांमधील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पाण्याबाबत नेमकी समस्या काय आहे, याचा अभ्यास करुन यश साने यांनी महापालिका पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच या भागातील पाणी समस्या यद्धपातळीवर सोडविण्याची आग्रही मागणी केली.

त्यासाठी यश साने यांनी कायम संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत सवांद सुरु ठेवला. अखेर आठवडाभरात या तीनही सोसायट्यांमधील पाणी समस्या सोडविण्यात साने यांना यश आले. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून विशेषतः महिला वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

अन महिलांकडून काकांच्या आठवणींना उजाळा

दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांनी पंधरा वर्ष या भागाचे प्रतिनिधीत्व केले. या कालावधीत स्थानिक जनतेशी सामाजिक कार्यातून त्यांची नाळ जोडली गेली होती. घरोघरी त्यांचा संपर्क असायचा. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते कायम तत्पर असायचे.   त्यांच्या पश्च्यात त्यांचे चिरंजीव यश यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालविण्याचा निर्धार केला आहे. याची प्रचिती मोरे वस्तीतील नागरिकांना येऊ लागली आहे.

कृष्णाई, ओंकार आणि कन्हैया या ती सोसायट्यांमधील पाणी समस्या जाणून घेण्यासाठी यश यांनी थेट तेथील नागरिकांची भेट घेतली. त्यावेळी उपस्थित महिलांनी त्यांच्यासमोर दत्ताकाका साने यांच्या आठवणींना उजाळा दिला. यशच्या रूपाने काकाच आमचे प्रश्न सोडविण्यासाठी आल्याची प्रतिक्रिया एका जेष्ठ महिलेने व्यक्त केली. त्यामुळे उपस्थित सर्वांना गहिवरून आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.