Chikhali News : भोसरी मतदारसंघात शिवसेनेचे 20 ते 25 नगरसेवक निवडून आणणार : शिवाजी आढळराव

एमपीसीन्यूज : शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेचे कार्य आणि महाविकास आघाडी सरकारच्या योजना घराघरात पोचवा. या माध्यमातून शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी बळकट करा. आगामी महापालिका निवडणुकीत एकट्या भोसरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे 20 ते 25 नगरसेवक निवडून आणायचे आहेत. त्यासाठी शिवसैनिक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे आवाहन शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी केले.

चिखली, घरकुल वसाहत आणि मोरेवस्ती येथील अष्टविनायक चौक येथे आढळराव यांच्या नेतृत्वाखाली शिवसंपर्क अभियानातंर्गत शिवसेना व युवा सेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी मार्गदर्शन करताना आढळराव पाटील बोलत होते.

शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, उपशहरप्रमुख अनिल सोमवंशी, शैलेश मोरे, निलेश मुटके, युवा सेनेचे सचिन सानप, शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख नेताजी काशीद, सर्जेराव भोसले,  उपविभागप्रमुख संजय गाढवे, आनंद हिंगे, सतीश डिसले, चंद्रकांत जाधव, आबा कापसे, संजय मोरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

आढळरावांकडून नेताजी काशीद यांचे कौतुक

शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून आढळराव पाटील भोसरी मतदारसंघातील विविध प्रभागांमध्ये शिवसैनिकांसोबत संवाद साधत आहेत. चिखली मोरेवस्ती येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी माजी उपशहरप्रमुख नेताजी काशीद यांच्या कार्याचा गौरव केला. काशीद हे आमचे जुने सहकारी आहेत. मोरेवस्ती परिसरात त्यांचे सामाजिक कार्य चांगले असल्याचे गौरवोद्गार आढळराव पाटील यांनी काढले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.