Chikhali News : शाळेत येताना विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे; सिद्धिविनायक पब्लिक स्कुलच्या सूचना

एमपीसीन्यूज : चिखली – सोमवार ( दि.23 ) शाळा सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मोरे वस्ती येथील सिद्धिविनायक पब्लिक स्कूलमधील इयत्ता 9 वी व 10 वीचे वर्ग दोन सत्रात भरविण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक वर्गाचे विभाजन करुन दोन वर्ग करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शाळेच्या संस्थापिका निर्मला जाधव आणि मुख्याध्यापिका बासंती महानंदा यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना निर्मला जाधव म्हणाल्या, शाळा सुरु करण्यापूर्वी शासन आणि शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. शाळेतील सर्व वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

सोमवारपासून नियमित शाळा सुरु होणार आहे. नववी आणि दहावीचे वर्ग दोन सत्रात म्हणजेच सकाळ आणि दुपारी भरविण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येक वर्गातील विद्यार्थी दोन वर्गात विभागण्यात आले आहेत. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचे पालन होईल.

विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी 9  वाजता शाळेत हजर राहावे. यावेळी विद्यार्थ्यांनी सोशल डिष्टंसिंगचे पालन करावे, मास्क लावावे व सॅनिटायझरचा वापर करावा. सर्दी, खोकला, ताप असेल तर विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये येऊ नये, घरीच थांबून औषधोपचार घ्यावेत.

_MPC_DIR_MPU_II

विद्यार्थ्यांनी शाळेत येताना घरून थेट शाळेत यावे. रस्त्यात इतरत्र कुठेही थांबू नये, तसेच शाळा सुटल्यानंतरही थेट घरी जावे. इतरत्र कुठे थांबू नये.तोंडाला मास्क नसल्यास संबंधित विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश दिला जाणार नाही.

विद्यार्थ्यांनी शाळेत येताना पाण्याची बॉटल सोबत आणावी. ती इतरांशी शेअर करू नये. तसेच जेवणाचा डबा आणू नये. विद्यार्थ्यांनी आपापसात हस्तांदोलन करू नये. कोरोनाचा संपूर्णपणे नायनाट होईपर्यंत या सर्व नियमांचे पालन  करणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे.

शाळेच्या आवारामध्ये कुठेही विद्यार्थ्यांनी गर्दी करू नये; अन्यथा कारवाई केली जाईल, अशा कडक सूचना मुख्याध्यापकांनी दिल्या आहेत.

शिक्षक पालक संघाची शनिवारी ऑनलाईन मिटिंग

सोमवारपासून नववी आणि दहावीचे वर्ग सुरु होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि पालकांमध्ये संवाद साधण्यासाठी तसेच पालकांच्या सूचना जाणून घेता याव्यात यासाठी उद्या, शनिवारी दुपारी चार वाजता शाळेतील शिक्षक- पालक संघाची ऑनलाईन मिटिंग आयोजित करण्यात आली असल्याचे मुख्याध्यापिका महानंदा यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like