Chikhali : तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एकाचा मृत्यू; दोघे जखमी, एका दुचाकीस्वाराला अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर दोन पादचारी गंभीर जखमी झाले आहेत. देहू-आळंदी रोड, चिखली आणि पिंपरीगाव येथे या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील एका दुचाकीस्वाराला अटक केली आहे.

अपघाताची पहिली घटना देहू-आळंदी रोड, चिखली येथे 24 जानेवारी रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस हवालदार सुरेश जयवंत जाधव यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनील ग्यानचंद विश्वकर्मा (वय 38, रा. कुदळवाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील हे दुचाकीवरून चिखलीकडून मोशीच्या दिशेने देहू-आळंदी रस्त्यावरून जात होते. त्यावेळी त्यांची दुचाकी घसरून ते पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

अपघाताची दुसरी घटना नवीन काटे पिंपळे रोड, पिंपरीगाव येथे शनिवारी (दि. 1) सकाळी अकराच्या सुमारास घडली. श्रीरंग मोरे (वय 80) असे जखमी झालेल्या पादचा-याचे नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र श्रीरंग मोरे (वय 48, रा. भैरवनाथनगर, पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील श्रीरंग मोरे हे पिंपळे काटे रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. यात मोरे गंभीर जखमी झाले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

अपघाताची तिसरी घटना मोशीमधील गायकवाड वस्ती येथे सोमवारी (दि. 3) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी राजेंद्र गणपत घाटगे (वय 71, रा. गायकवाड वस्ती, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रथमेश मनोहर माठे (वय 23, रा. कल्याण) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घाटगे पुणे-नाशिक महामार्ग ओलांडत होते. त्यावेळी आरोपी माठे याच्या भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या पायाचे हाड मोडून ते जखमी झाले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.