Chikhali : चिखलीतील कोंडवाड्याच्या जागेत गोशाळा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे मोकाट जनावरांचे संगोपन करण्यासाठी गोठ्याचे (कोंडवाडा) आरक्षण आहे. सदर जागा चंद्रभागा गोशाळा संवर्धन संस्था ट्रस्ट या खासगी संस्थेला गोशाळा चालविण्यासाठी देण्यात आली आहे.

शहरात मोकाट कुत्री व डुकरांसह जनावरांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. ही जनावरे बिथरल्याने नागरिक व वाहनचालक जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या संदर्भात सत्ताधार्‍यांसह विरोधी नगरसेवकांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करीत आहेत. तसेच, पालिका सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी तक्रारींचा पाढा वाचला होता. मात्र, त्यावर पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात होता. या संदर्भात तक्रारी वाढल्याने अखेर, कोंडवाडा चालविण्यासाठी खासगी संस्थेला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेचे चिखली येथील गट क्रमांक 1,655/2, आरक्षण क्रमांक 1/79 ही जागा कोंडवाड्यासाठी आरक्षित आहे. ती जागा पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या नियंत्रणाखाली आहे. जागेचा ताबा पशुवैद्यकीय विभागाकडे ठेवून चंद्रभागा संस्थेला गोशाळा चालविण्यासाठी देण्यात येणार आहे.

ही संस्था गेल्या 12 वर्षांपासून गोपालन क्षेत्रात कार्यरत आहे. देशी गायींचे संगोपन करणे हे या संस्थेचा हेतू आहे. दूध न देणार्‍या गायी, आजारी किंवा अपंग जनावरांचा सांभाळ करणे आणि त्याना आहार पुरविण्याचा संस्थेचे नियोजन आहे. या संस्थेला चिखलीची जागा देण्याचा प्रस्तावाला शहर सुधारणा समितीने 31 ऑगस्टला मंजुरी दिली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.