Chikhali : कोरोना संशयितांना घरकुल येथील रिकाम्या इमारतींमध्ये ठेवणार; परिसरातील रहिवाशांचा विरोध

एमपीसी न्यूज – परदेशातून भारतात आलेल्या संशयित कोरोना बाधितांना पिंपरी-चिंचवड प्रशासन चिखली मधील घरकुल येथील मोकळ्या इमारतींमध्ये ठेवण्याच्या तयारीत आहे. मात्र, या नागरिकांना घरकुल येथे न ठेवण्याबाबत स्थानिक नागरिकांनी आयुक्तांना विनंती केली आहे. दाट लोकवस्ती, लहान मुले आणि वृद्धांचा वावर तसेच जवळजवळ असलेल्या इमारती यामुळे याचा धोका वाढू शकतो, असे स्थानिक नागरिकांचे मत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. शनिवारी (दि. 14) आणखी पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणी अहवालात समोर आले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड मधील बाधितांचा आकडा आठवर पोहोचला आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 15 जणांना याची लागण झाली आहे. त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण राज्याचे लक्ष पुणे आणि विशेषतः पिंपरी-चिंचवडकडे केंद्रित झाले आहे.

शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील सिनेमागृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव, शाळा, महाविद्यालये, मॉल बंद ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. शनिवारी पोलिसांनी शहरातील मॉल प्रशासनाला काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मॉल सुरु ठेवण्यात आले. शाळा, महाविद्यालयांनी बंदच्या सुचनेचे पालन केले आहे. काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली असून कर्मचा-यांना ड्युटीवर हजर राहण्यास सांगितले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील आकडा वाढला असल्याने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी परदेशातून येणा-या संशयितांना विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी घरकुल येथील रिकाम्या इमारतींमध्ये या नागरिकांना ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. शनिवारी सकाळी अकरा वाजता महापालिका आयुक्तांनी घरकुल येथील रिकाम्या इमारतींना भेट दिली. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी त्याला सौम्य विरोध करत नागरिकांना इतर ठिकाणी ठेवण्याची विनंती केली.

फेडरेशन ऑफ घरकुलचे अध्यक्ष सुधाकर धुरी म्हणाले, “घरकुल मधील इमारतींमध्ये अत्यंत कमी अंतर आहे. संशयित नागरिकांना घरकुल येथील इमारतींमध्ये ठेवल्यास त्याचा  परिसरातील नागरिकांना मोठा धोका आहे. लहान मुले, वृद्धांचा इथे कायम वावर असतो. घरकुल येथील नागरिक दररोज कामानिमित्त संपूर्ण शहरात फिरतात. त्यामुळे याचा धोका मोठा आहे. लोकवस्तीपासून काही अंतरावर असलेल्या महापालिकेच्या रिकाम्या इमारतींमध्ये या नागरिकांना ठेवण्याची विनंती नागरिकांकडून आयुक्तांना करण्यात आली आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.