Chikhali : विरोधकांकडून ‘टीपी स्कीम’बाबत जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न – महापौर जाधव

एमपीसी न्यूज – जाधववाडी, चिखली, च-होली या भागात टाऊन प्लॅनिंग (टीपी) स्कीम राबविणे शक्य आहे. याबाबतच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली आहे. परंतु, या भागात ‘टीपी स्कीम’ राबवयाची की नाही हे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या निर्णयावरच अवलंबून आहे. असे असताना विरोधकांकडून ‘टीपी स्कीम’बाबत अफवा पसरवून जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप महापौर राहुल जाधव यांनी केला आहे. विरोधकांच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले.

महापौर म्हणाले की, ‘टीपी स्कीम’बाबत विरोधक अफवा पसरवून जनतेमध्ये गैरसमज निर्माण करत आहेत. विरोधकांनी प्रथमत: व्यवस्थितपणे माहिती घ्यावी. नंतरच टीपी स्कीम’बाबत वक्तव्य करावे. या भागात टीपी स्कीम’ राबविणे हे पूर्णपणे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांच्या निर्णयावरच अवलंबून आहे. टीपी स्कीम’ राबवायची किंवा नाही हे जनतेने ठरवावे. तो अधिकारच संपूर्णत: स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांचा आहे.

त्यामुळे विरोधकांनी नाहक जनतेमध्ये गैरसमज पसरवून जनतेच्या भावनांशी खेळण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये. आपण जनतेमध्ये जे गैरसमज पसरवत आहात. त्यामुळे एखाद्या गोरगरीब व्यक्तीला त्याचा धक्का बसू शकतो. त्याचे भान विरोधकांनी बाळगावे असेही महापौर जाधव म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.