Chikhali : सीएनजी पंपावर दरोडा टाकण्याचा डाव चिखली पोलिसांनी उधळला; आक्या बॉण्डसह दोघांना अटक

एमपीसी न्यूज – सीएनजी पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याचा डाव चिखली पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांनी सराईत गुन्हेगार आक्या बॉण्डसह दोघांना अटक करून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ही घटना आज (रविवारी) पहाटे जाधववाडी येथे घडली.

सुमित उर्फ आक्या बॉण्ड पांडुरंग मोहोळ (वय 19, रा. घरकुल, चिखली), अक्षय संदीप चव्हाण (वय 19, रा. घरकुल, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या अन्य तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधववाडी येथे असलेल्या सीएनजी पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत पाचजण आहेत. ते मोटारीमध्ये (एम एच 03 / ए एम 9659) दडून बसले असून योग्य वेळेची वाट पाहत आहेत, अशी माहिती चिखली पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेतले. मोटारीची तपासणी केली असता त्यामध्ये लोखंडी कोयता, स्टीलचा पाईप, काळी बॅग, दोन लोखंडी कटावण्या, स्क्रू ड्रायवर, लोखंडी करवत, लोखंडी पक्कड, सुती दोरी, मिरची पूड अशी घातक शस्त्रे आढळून आली.

पोलिसांनी मोटार आणि शस्त्रे असा एकूण 5 लाख 2 हजार 30 रुपयांचा ऐवज जप्त केला. दोघांना अटक करून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी आक्या बॉण्ड याच्यावर यापूर्वी मारहाण, शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचे गुन्हे दाखल आहेत. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.