Chikhali: संत पीठाच्या सल्लागाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव स्थायीत तहकूब

संत पीठाचे काम सुरु; अभ्यास करुन प्रस्ताव फेटाळणार, स्थायी समिती सभापती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात येत असलेल्या ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा’च्या कामाच्या सल्लागाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने दोन आठवडे तहकूब केला आहे. संत पीठाचे काम वेगात सुरु असून तोच सल्लागार काम करत आहे. त्यामुळे अभ्यास करुन हा प्रस्ताव फेटाळणार असल्याचे स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी सांगितले.

महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) पार पडली. सभापती विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. भागवत धर्माचा प्रसार व प्रचार व्हावा अन् वारकरी सांप्रदायाचे पारंपारीक शिक्षण जनमाणसांना मिळावे, या उद्देशाने हे ‘संतपीठ’ उभारण्यात येत आहे.

  • या संतपीठाच्या इमारतीसाठी तब्बल 45 कोटी 9 लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे. हे काम बी. के. खोसे ठेकेदाराला वाढीव दराने दिल्याचे आरोप झाला. गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशीत कोणत्याही त्रृटी नसल्याचा निर्वाळा करत महापालिकेने ठेकेदाराला कामाचे आदेश दिले. या प्रकल्पासाठी नुयोग जबुवानी या सल्लागार संस्थेची वास्तुविशारद आणि सल्लागार म्हणून नेमणूक केली होती.

मात्र, हा सल्लागार काम करत नसल्याने संतपीठाचे काम रखडल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने नुयोग जबुवानी या सल्लागाराचे काम रद्द केले होते. सल्लागाराला काळ्या यादीत टाकून त्यांच्या जागी निओजन आर्किटेक्ट अॅन्ड कन्सलटंट यांची संतपीठासाठी वास्तुविशारद व सल्लागार म्हणून नेमणूक करण्याचा प्रस्ताव स्थायी समोर मान्यतेसाठी ठेवला होता. तथापि, संत पीठाचे काम सुरु असताना आणि हाच सल्लागार काम करत असताना अचानक बदलण्याचे नेमके कारण काय? असा सवाल करत स्थायी समितीने हा प्रस्ताव दोन आठवडे तहकूब ठेवला आहे.

याबाबत बोलताना स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी म्हणाले, ”चिखलीतील संत पीठाचे काम प्रगतीपथावर आहे. नुयोग जबुवानी हाच सल्लागार काम करत आहे. मात्र, अचानक या सल्लागाराला काळ्या यादीत टाकण्याचे नेमके कारण समजले नाही. त्यामुळे प्रस्ताव दोन आठवडे तहकूब केला आहे. अभ्यास करुन सल्लागाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव फेटाळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.