Chikhali : देवदर्शनासाठी जाताना प्रसंगावधान दाखवले अन मोठे संकट टळले

एमपीसी न्यूज – मुलाचे लग्न झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब देवदर्शासाठी गेले. जाताना कुटुंबातील सदस्यांनी प्रसंगावधान दाखवत सर्व मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम सोबत घेतली. कुटुंब देवदर्शन करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. मात्र चोरट्यांच्या हाती केवळ देव्हा-यात ठेवलेले एक मंगळसूत्र आले. यामुळे कुटुंबावर आलेले मोठे संकट टळले. ही घटना गुरुवारी ( दि. 20 ) दुपारी एक ते पाच वाजण्याच्या सुमारास ताम्हाणे वस्ती येथे घडली.

दिलीप पंढरीनाथ दिवटे (वय 61, रा. तोडकर अपार्टमेंट, शिवरकर चौक, ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप यांच्या मुलाचा नुकताच विवाह झाला. त्यामुळे संपूर्ण दिवटे कुटुंब देवदर्शनासाठी गेले. जाताना दिवटे कुटुंबीयांनी सर्व मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम सोबत घेतली. सर्वजण देवदर्शनात व्यस्त असताना गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी संपूर्ण घर धुंडाळले मात्र त्यांना काहीही मिळाले नाही. शेवटी देव्हा-यात पूजेसाठी ठेवलेले एक 37 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्यांच्या हाती लागले. ते घेऊन चोरटे पसार झाले. दिवटे तुळजापूर येथे असताना त्यांना त्यांच्या शेजा-यांनी फोनवरून चोरी झाल्याची माहिती दिली. चोरीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर देखील ते संपूर्ण देवदर्शन करून आले. कारण त्यांच्या घरातील मौल्यवान दागिने आणि रक्कम त्यांच्या सोबत होती. देवदर्शन करून आल्यानंतर रात्री सव्वा नऊच्या सुमारास चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.