Chikhali : उघड्या वायरचा शॉक लागून भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रिक डीपीमध्ये भूमिगत जाणा-या उच्चदाब वायरचा शॉक लागून महिला भाजली. ही घटना 16 नोव्हेंबर रोजी नेवाळेवस्ती येथे सायंकाळी घडली. भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान 20 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला.

सुप्रिया संजय खांडेकर (वय 40, रा. चिखली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयत सुप्रिया 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी पायी चालत जात होत्या. त्या नेवाळेवस्ती येथील मुख्य चौकाजवळ आल्या असता इलेक्ट्रिक डीपीमध्ये जाणा-या भूमिगत वायरचा त्यांना शॉक लागला. यामध्ये त्यांच्या साडीने पेट घेतला आणि त्या गंभीररीत्या भाजल्या.

सुप्रिया यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या जास्त भाजल्या असल्यामुळे त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना बुधवारी (दि. 20) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

वायर उघडी राहिली, त्यासाठी कोण जबाबदार आहे?, याबाबतची माहिती घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.