Chikhali : रुपीनगर येथे महिलेचा पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – रुपीनगर येथे महिलेने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी पावणे दोनच्या सुमारास उघडकीस आली.

शीतल किरण ठवाळ (वय 28, रा. रुपीनगर, तळवडे) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिला तिच्या पतीसह मागील तीन महिन्यांपासून रुपीनगर येथे राहण्यासाठी आली आहे. शीतल यांचे पती आज (मंगळवारी) सकाळी कामानिमित्त मुंबईला गेले.

दरम्यान, एकच्या सुमारास शीतल यांनी राहत्या घराचा दरवाजा आतून बंद केला आणि पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. काही वेळेनंतर त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहणा-या नागरिकांना पावणेदोनच्या सुमारास काहीतरी जाळल्याचा वास आला. त्यानंतर नागरिकांनी खालच्या मजल्यावर येऊन पहिले असता शीतल यांच्या घरातून धूर येत होता. तसेच दरवाजा आतून बंद होता.

नागरिकांनी तात्काळ चिखली पोलिसांना घटनेची माहिती दिली. चिखली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी शीतल या जळालेल्या अवस्थेत दिसल्या. पोलिसांनी गंभीर जखमी अस्वस्थेतील शीतल यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच त्यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली आहे. घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.