Chikhali : आदल्या दिवशी कारवाई झालेले ‘ताडी’चे दुकान दुस-या दिवशी पुन्हा सुरु!; महिलांनी पुढाकार घेऊन फोडले दुकान

अवैध व्यावसायिकांचे पोलिसांना आव्हान की पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; नागरिकांमध्ये संभ्रम

एमपीसी न्यूज – चिखलीमधील साने चौकात पोलिसांनी आदल्या दिवशी कारवाई केलेले ताडी विक्री दुकान दुस-या दिवशी लगेच सुरु झाले. यामुळे हे अवैध व्यावसायिकांचे पोलिसांना आव्हान आहे की पोलिसांचे या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. पोलिसांनी कारवाई करूनही सुरु झालेले दुकान त्रासदायक ठरत असल्याने स्थानिक महिलांनी पुढाकार घेऊन हे दुकान फोडले.

चिखली येथील साने चौकाजवळ म्हेत्रे गार्डनकडे जाणा-या मार्गावर स्वप्ननगरी हाऊसिंग सोसायटी जवळ एक अवैध ताडी विक्रीचे दुकान आहे. या दुकानावर टवाळखोर थांबून असतात. रस्त्याने येणा-या-जाणा-या महिलांना व स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. साने चौक येथील स्थानिक नागरिक हर्षद लोखंडे हे गुरुवारी सकाळी ताडी विक्रीच्या दुकानासमोरून जात होते. त्यावेळी दुकानावरील काहीजण भर रस्त्यात गाडी उभी करून ताडी पीत होते. त्यांना लोखंडे यांनी गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्यावरून काहीजणांनी लोखंडे यांना ‘भाई लागून गेला का? कापून टाकीन’ अशी धमकी दिली.

त्यानंतर, लोखंडे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. मात्र, यावर ठोस कारवाई झाली नाही. इथे येणारे मद्यपी भर रस्त्यावर लघुशंका करतात. वारंवार गोंधळ होत असल्याने गंभीर गुन्हा होण्याची शक्यता आहे. रस्त्याने येणा-या जाणा-या महिलांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे 60 ते 70 महिलांनी एकत्र येऊन बेकायदेशीर सुरु असलेले ताडी विक्री केंद्र फोडून टाकले.

_MPC_DIR_MPU_II

मागील एक महिन्यापूर्वी या ताडी विक्री केंद्रावरील काही टवाळखोरांनी एका महिलेची छेड काढली होती. मागील दोन महिन्यांपूर्वी या ताडी विक्री केंद्रावरील टवाळखोरांनी एका वृद्ध नागरिकाला तंबाखू मागितली. नागरिकाने आपल्याकडे तंबाखू नसल्याचे सांगितले. त्यावरून टवाळखोरांनी ज्येष्ठ नागरिकाला कोयत्याने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारही करण्यात आली आहे.

पोलिसांनी या ताडी विक्री करणा-या बेकायदेशीर दुकानावर मागील दोन दिवसांपूर्वी कारवाई केली होती. मात्र, पोलिसांची कारवाई झाल्यानंतर संबंधितांनी लगेच दुस-या दिवशी दिमाखात दुकान पुन्हा सुरु केले. या प्रकारातून अवैध व्यावसायिक पोलिसांना आव्हान देतात की पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, हा स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने म्हणाले, “बुधवारी पोलिसांनी संबंधित दुकानावर कारवाई केली आहे. पोलिसांनी ताडीवाला, दारू विक्रेता आणि जागा भाड्याने देणारी एक महिला अशा तिघांना न्यायालयात हजर केले आहे. संबंधित ठिकाणी पोलीस उपस्थित आहेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1