Chikhali : घर सोडताना साफसफाई केली नाही तसेच भाडेही दिले नाही म्हणून घरमालकाकडून भाडेकरू कुटूंबास मारहाण

एमपीसी न्यूज – भाड्याचे घर सोडताना भाडेकरूने घराची साफसफाई केली नाही, तसेच घरभाडेही दिले नाही, या कारणावरून घरमालकाने भाडेकरूच्या घरात घुसून कुटूंबास मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 12) दुपारी जाधववाडी, चिखली येथे घडली.

मंगल धनवे, तुषार धनवे, मंगल धनवे यांचा पती, एक अनोळखी महिला व इतर सात ते आठ अनोळखी पुरूष (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत वाल्मिक गोनीनाथ जगताप (वय 48, रा. पंतनगर, जाधववाडी, चिखली) यांनी मंगळवारी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाल्मिक हे आरोपींकडे भाड्याने राहण्यास होते. त्यांनी घर सोडताना खोलीची साफसफाई केली नाही. तसेच उर्वरित घरभाडेही दिले नाही. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास आरोपी मोटार तसेच तीन दुचाकीवरून फिर्यादी वाल्मिकी यांच्या घरी आले.

आरोपींनी फिर्यादी यांच्या पत्नीला मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी त्यांचा मुलगा राहूल आणि मुलगी कोमल हे दोघेजण आईला वाचविण्यासाठी आले. त्यावेळी सोबत असलेल्या इतरांनी त्या दोघांना हाताने मारहाण केली. मुलगा राहूल यास पार्किंमध्ये ओढत नेत त्यास लोखंडी रॉडने मारहाण केली.

आपल्या कुटूंबास मारहाण होत असल्याची माहिती मिळताच दुसरा मुलगा मोटारीतून आला असता त्यालाही आरोपींनी मारहाण केली. तसेच रोहित याच्या मोटारीच्या काचा फोडून व इतर ठिकाणी मारून मोटारीचे नुकसान केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.