Chikhali : खेड येथील दुहेरी हत्याकांडाचे चिखलीतील गुन्हेगारी टोळीशी धागेदोरे; बदला घेण्याच्या इर्षेतून झाला ‘त्या’ दोघांचा खून

खेड दुहेरी हत्याकांडातील दोघांना चिखली पोलिसांकडून अटक : The double murder at Khed is linked to a criminal gang in Chikhali; Out of jealousy of revenge, 'those' two were killed

एमपीसी न्यूज – खेड येथे शिरोली गावच्या हद्दीत झालेल्या दोन तरुणांच्या खुनाचे धागेदोरे चिखली येथील गुन्हेगारी टोळीशी जोडलेले आहेत. या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील दोघांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
सुरज प्रकाश रणदिवे (रा. नंदनवन हौसिंग सोसायटी, घरकुल चिखली), किरण चंद्रकांत बेळामगी (रा. निलरत्न हाऊसिंग सोसायटी, घरकुल चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
निरंजन गुरव आणि बजरंग जाधव (रा. वैदवस्ती, पिंपळे गुरव) या दोघांचा खेड येथे खून झाला आहे.
काय आहे प्रकार
आक्‍या बॉण्ड आणि अमित चव्हाण या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्वावरून वाद आहे. याच वादातून आक्‍या बॉन्ड टोळीने अमित चव्हाण याच्यावर खूनी हल्ला केला होता. या हल्ल्याचा बदला अमित चव्हाण टोळीने घेत आक्‍या बॉण्ड टोळीतील अनिकेत रणदिवे याचा 29 मे 2020 रोजी घरकुल, चिखली येथे खून केला.

रणदिवे खून प्रकरणातील सर्व आरोपींना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, प्रतिस्पर्धी अमित चव्हाण टोळीतील निरंजन गुरव आणि बजरंग जाधव हे दोघेही रणदिवे याच्या खूनात सहभागी असल्याचा गैरसमज आक्‍या बॉण्ड टोळीतील सदस्यांना झाला होता.
याचाच बदला घेण्यासाठी आक्‍या बॉण्ड टोळीने निरंजन गुरव आणि बजरंग जाधव या दोघांचा खून केला. खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरोली गावाच्या जवळ 8 ऑगस्ट रोजी खून झाल्याचे उघडकीस आले होते.
पोलिसांकडून आरोपींना अटक
चिखली पोलीस परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक चेतन सावंत व पोलीस शिपाई संतोष सपकाळ यांना माहिती मिळाली की, खेड पोलीस ठाण्यात 8 ऑगस्ट रोजी दाखल असलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी फरार आहेत. ते आरोपी चिंचवडगाव येथील बस स्टॉपवर येणार आहेत.
त्यानुसार पोलिसांनी चिंचवडगाव बस स्टॉप परिसरात सापळा लावून सुरज आणि किरण या दोघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता सुरज आणि किरण या दोघांनी त्यांच्या अन्य साथीदारांसोबत मिळून दुहेरी हत्याकांड केल्याची कबुली दिली. त्यावरून दोघांना अटक करून पुढील कारवाईसाठी खेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.