Chikhali: आठवडे बाजारात भाजीपाला विक्रेत्यांसह टेम्पो, हातगाड्या अन टप-यांवरही ‘अतिक्रमण’ची कारवाई

एमपीसी न्यूज – चिखली येथे आठवडे बाजारात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये तीन पत्राशेड, दोन टेम्पो, चार हातगाड्या, तीन टप-या जप्त केल्या. तसेच रस्त्यावर भाजीपाला विकणा-यांवर देखील कारवाई करण्यात आली. या विक्रेत्यांचा भाजीपाला मोशी येथील कचरा डेपोत टाकण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 2) करण्यात आली.

देहू-आळंदी रस्त्यावर डायमंड चौक, मोइ फाटा ते टाळ चौक, पाटील नगर येथे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार, कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव, पोलीस निरीक्षक (नियोजन) प्रसाद गोकुळे, पोलीस निरीक्षक दिलीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

महापालिकेचे प्रभारी प्रशासन अधिकारी सुरेश कोंढरे यांनी याबाबत माहिती दिली. चार हातगाड्या, तीन लोखंडी टप-या, सहा लोखंडी काऊंटर, आठ लाकडी काऊंटर, 28 प्लॅस्टिक क्रेट, आठ लोखंडी खाटा, दोन टेम्पो, एक लोखंडी कमान, पाच स्टीलचे पाईप, दोन लोखंडी बाके, चार लाकडी स्टँड, दोन लोखंडी बोर्ड, दोन लोखंडी स्टँड, तीन पोते कपडे, दोन पोती बेडशीट, तीन पोते स्वेटर, एक पोते कापडी पिशव्या तसेच एक पोते इतर साहित्य या कारवाईमध्ये जप्त करण्यात आले.

वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक (नियोजन) प्रसाद गोकुळे म्हणाले, “वाहतुकीस अडथळा ठरणा-या अनधिकृत टप-या, हातगाड्यांवर महापालिका व पोलिसांकडून संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यांतर्गत गुरुवारी देहू-आळंदी रस्त्यावरील आठवडे बाजारात ही कारवाई झाली. यापुढेही अशी कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी किंवा कोणीही वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.