Chikhali: लिफ्ट मागितलेल्या दोघांनी कारच पळवली

फिर्यादी जैद यांनी कुठे जायचे आहे, अशी विचारणा केली असता अनोळखी व्यक्‍तींनी अहमदनगरला जायचे असल्याचे सांगितले. यामुळे जैद यांनी त्यांना कारमध्ये घेतले. रस्त्यात अनोळखी व्यक्‍तींनी जैद यांचा विश्‍वास संपादन केला.

एमपीसी न्यूज – अहमदनगरला जाण्यासाठी कारने निघालेल्या एकाला लिफ्ट मागून दोघेजण कारमध्ये बसले. त्यानंतर संधी साधून दोघांनी कार पळवून नेली. ही घटना 14 ते 15 मार्च दरम्यान चिखली ते अहमदनगर दरम्यान घडली.

तुकाराम भागुजी जैद (वय 45, रा. शिवतेजनगर, चिखली) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्‍तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जैद हे अहमदनगर येथील आपल्या मित्राला भेटण्यासाठी 14 मार्च रोजी सायंकाळी चिखलीतून निघाले. सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास त्यांना स्पाइन रोड, चिखली येथे दोन जणांनी हात केला.

फिर्यादी जैद यांनी कुठे जायचे आहे, अशी विचारणा केली असता अनोळखी व्यक्‍तींनी अहमदनगरला जायचे असल्याचे सांगितले. यामुळे जैद यांनी त्यांना कारमध्ये घेतले. रस्त्यात अनोळखी व्यक्‍तींनी जैद यांचा विश्‍वास संपादन केला. रस्त्यात त्यांनी खाण्या-पिण्याची पार्टीही केली.

पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी जैद हे लघुशंका करण्यासाठी कारमधून खाली उतरले. त्यावेळी आरोपींनी त्यांची कार पळवून नेली. याबाबत अहमदनगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र गुन्ह्याची सुरवात चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू झाल्याने हा गुन्हा तपासाकरिता चिखली पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.