Chikhali : कृष्णानगर चौकात इलेक्ट्रिक डीपीला आग; तीन टपऱ्या आगीच्या भक्ष्यस्थानी

एमपीसी न्यूज – चिखली येथील कृष्णानगर चौकात इलेक्ट्रिक डीपीला आग लागली. ही आग पसरल्याने आसपासच्या तीन टपऱ्या जाळून खाक झाल्या. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविल्याने शेजारीच असणाऱ्या चार टपऱ्या सुरक्षित राहिल्या. ही घटना शनिवारी (दि. 2) संध्याकाळी पाच वाजता घडली.

फायरमन अशोक कदम यांना मुख्य अग्निशमन केंद्रातून माहिती मिळाली की, चिखली येथील कृष्णानगर चौकात इलेक्ट्रिक डीपीला आग लागली आहे. त्यानुसार चिखली उपकेंद्राचे सिनिअर फायरमन अशोक पिंपरे, वाहन चालक लक्ष्मण बंडगर, फायरमन अनिल निकम, सुशीलकुमार राणे, अवधुत आल्हाट, अक्षयदीप नवले यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

इलेक्ट्रिक डीपीला लागलेली आग पसरल्याने शेजारच्या तीन टपऱ्यांमध्ये आग लागली होती. विद्युत विभागाशी संपर्क करून सुरुवातीला डीपीचा वीजप्रवाह बंद करण्यात आला. त्यानंतर पाणी मारून तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. दरम्यान तीन टपऱ्या जळाल्या आहेत. तर त्याच्या शेजारी असलेल्या चार टपऱ्या वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.