Chikhali : विनाकारण तिघांना कोयत्याने मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भाजीविक्रेत्याकडे काम करणाऱ्या एकाला रस्त्यात अडवून कोयत्याने मारहाण केली. त्यानंतर भाजीविक्रेत्या दांपत्यास देखील धमकी देत कोयत्याने मारहाण केली. यामध्ये तीन जण जखमी झाले. तसेच भाजीविक्रेत्याकडून 20 हजारांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 11) दुपारी दिडच्या सुमारास स्पाईनरोड, भीमशक्तीनगर झोपडपट्टी जवळ, चिखली आणि कृष्णानगर भाजीमार्केट येथे घडली.

अंबादास किमलींग कोरे, समाधान ज्ञानेश्वर गवळी (वय 31, रा. भीमशक्तीनगर, स्पाईनरोड, चिखली), स्वाती गवळी अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी समाधान यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश शिनगारे, दीपक शिनगारे, रोहित जुजगर, लखन बसवराज गाडे, रुपेश ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी अंबादास कोरे हा फिर्यादी समाधान गवळी यांच्याकडे कामाला आहे. सोमवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास अंबादास आणि त्याची पत्नी स्पाईनरोड भिमशक्तीनगर झोपडपट्टी जवळ रस्त्याने पायी चालत जात होते.

त्यावेळी आरोपींनी त्यांना अडविले. ‘तू समाधान गवळी कडे काम करतो ना’, असे म्हणत आरोपींनी अंबादास यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये अंबादास गंभीर जखमी झाले.

त्यानंतर सर्व आरोपी हे समाधान गवळी यांच्याकडे गेले. ‘आताच तुझा कामगार अंबादास कोरे याचे हात-पाय तोडून आलो आहे’, असे म्हणत समाधान यांच्यावर देखील कोयत्याने वार केले. आरोपी रोहित याने फिर्यादी यांच्या पत्नी स्वाती यांना कोयत्याने मारहाण केली.

त्यानंतर आरोपींनी समाधान आणि त्यांच्या पत्नीकडील 20 हजार 200 रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.