Chikhali : अंगावर टेम्पो घालत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

एमपीसी न्यूज – धोकादायकरित्या एलपीजी गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अडवल्यावरून टेम्पो चालकाने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर टेम्पो घातला. तसेच टेम्पो थांबवण्याची विनंती करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि. 30) दुपारी एकच्या सुमारास डायमंड चौक चिखली आणि कुदळवाडी पुलाजवळ घडला.

पोलीस नाईक सचिन लक्ष्मण निघोट यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अशोक शोमराव बिश्नोई (वय 20, रा. जाधववस्ती आकुर्डी), कैलास भवरलाल बिष्णोई (वय 21, रा. आकुर्डी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक सचिन निघोट तळवडे वाहतूक विभागात कार्यरत आहेत. ते मंगळवारी दुपारी चिखली मधील डायमंड चौकात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी आरोपी अशोक एलपीजी गॅस सिलेंडर धोकादायकरित्या भरलेला एक टेम्पो (एम एच 11 / ए जी 4361) घेऊन जात होता. सचिन यांनी अशोक याला टेम्पो थांबवण्याची विनंती केली. त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आणि धोकादायकरित्या सिलेंडर घेऊन जात असल्याबाबत विचारणा करताना त्याने सचिन यांना धक्का देत टेंपो पुढे नेला. ‘तुम्हाला काय करायचे आहे’ असे उत्तर देऊन तो कुदळवाडी पुलाच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. त्यामुळे सचिन यांनी टेंपोचा पाठलाग करून टेम्पो थांबवण्यास सांगितले.

तरीही अशोक याने टेम्पो न थांबता सचिन यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. यामध्ये सचिन रस्त्यावर पडले. त्यांना दुखापत झाली. हा अपघात झाल्यानंतर देखील अशोक अपघाताच्या ठिकाणी न थांबता स्पाईन रोडने भरधाव वेगात गेला. सचिन यांनी पुन्हा त्याचा पाठलाग करून त्याला थांबण्यास सांगितले. त्यावेळी अशोकने टेम्पो थांबवून सचिन यांना धक्काबुक्की केली. तर आरोपी कैलास याने टेम्पो मधील गॅस सिलेंडर सचिन यांच्या दिशेने फेकला. याबाबत सचिन यांनी चिखली पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा तसेच वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like