Chikhali : दत्ता साने कार्यालय तोडफोडप्रकरणी दोघेजण ताब्यात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालय तोडफोडप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या किरकोळ वादातून घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

खडकी येथे राहणाऱ्या 20 वर्षीय दोन तरुणांना भोसरी पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास करणे सुरू आहे. तपासात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपींचा दत्ता साने यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. यावरून त्यांनी कार्यालयात तोडफोड केली. दरम्यान, त्यांचे अन्य साथीदार पळून गेले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे चिखली मधील साने चौक येथे जनसंपर्क कार्यालय आहे. कार्यालयात शुक्रवारी (दि. 7) दुपारी त्यांच्या दोन मुली होत्या. चारच्या सुमारास सात तरुण कार्यालयात आले. त्यांच्या हातात लोखंडी कोयत्यासारखी शस्त्रे होती. त्यांनी कार्यालयाच्या केबिनची काच तसेच टेबलवरील काच फोडून नुकसान केले.

त्याचबरोबर आरोपींनी दत्ता साने यांच्या फोटोवर कोयत्याने क्रॉस वार केले. कार्यालयाची तोडफोड करून आरोपी घटनस्थळावरून पळून गेले. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्यानुसार पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.