Chikhali : बिअर शॉपमध्ये काउंटरजवळ थुंकल्यावरून वाद; परस्परविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – बिअरबारमध्ये ग्राहकाने बिअर घेऊन जाताना काउंटरजवळ थुंकल्याने वाद झाला. यामध्ये ग्राहकाने बिअरची बाटली दुकानदाराच्या डोक्यात फोडली. ही घटना सम्राट बिअर शॉपी देहू-आळंदी रोड चिखली येथे सोमवारी (दि. 26) सायंकाळी घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंगद शेषराव कांबळे (वय 42, रा. चिखली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अजय रादु हिरोत (वय 21), जितेन रादु हिरोत (वय 21), विकास मदनलाल चौहान (वय 19, तिघे रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंगद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी अंगद यांच्या चिखली येथील बिअर शॉपीवर आले. त्यांनी एक बिअर मागितली. पैसे देऊन बिअर घेऊन जाऊ लागले. जाताना एकजण बिअर शॉपीच्या काउंटर जवळ थुंकला. त्यामुळे अंगद यांनी त्याला इथे थुंकू नको, म्हणून रोखले. त्यावरून ‘मी इथेच थुंकणार’ असे म्हणून आरोपीने अंगद यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. यामध्ये अंगद गंभीर जखमी झाले.

याच्या परस्पर विरोधात अजय रादु हिरोत यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अंगद शेषराव कांबळे आणि त्यांचे दोन कामगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अजय आणि त्यांचे दोन भाऊ सोमवारी सायंकाळी आरोपी अंगद यांच्या बिअर शॉपीमध्ये गेले. त्यांनी दुकानातून बिअर घेतली. दुकानाच्या बाहेर येऊन थुंकल्याच्या कारणावरून अंगद आणि त्याच्या दोन कामगारांनी मिळून अजय आणि त्यांच्या दोन भावांना लाकडी बांबूने मारहाण केली. यामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले. दोन्ही गुन्ह्याचा तपास चिखली पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like