Chikhali : ‘आमच्यासोबत का राहत नाही’ म्हणत तीन वाहनांची तोडफोड; पाच जणांवर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज – ‘आमच्या सोबत का राहत नाही’ असे म्हणून शिवीगाळ करत कोयते, लाकडी दांडके आणि दगडाने तीन दुचाकी वाहनांची तोडफोड केली. ही घटना बुधवारी (दि. 29) सकाळी साडेअकरा वाजता जाधववाडी, चिखली येथे घडली आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. 1) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्ता देवकर, संतोष चौगुले, राहुल (पूर्ण नाव माहिती नाही. सर्व रा. मोहननगर, चिंचवड) आणि त्यांचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुनील गंगाराम कुसाळकर (वय 28, रा. बोल्हाईमळा, जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहे. बुधवारी सकाळी आरोपी फिर्यादी यांच्या घरासमोर आले. आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करत ‘आमच्या सोबत का राहत नाही’ असा जाब विचारला. त्यानंतर फिर्यादी यांची बजाज बॉक्सर (एम एच 14 / बी पी 4710), फिर्यादी यांच्या वडिलांची बजाज बॉक्सर (एम एच 12 / बी आर 1770) तसेच फिर्यादी यांचे भाडेकरू नागनाथ मोरे यांची स्कूटी पेप्ट दुचाकी कोयते, लाकडी दांडके आणि दगडाने फोडून टाकल्या.

तिन्ही दुचाकींचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. किरकोळ कारणावरून अशा प्रकारचा गोंधळ होत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.