Chikhali : पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच; आणखी पाच वाहनांची चोरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. दररोज शहरातील कोणत्या-ना-कोणत्या पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातून देखील वाहन चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शहरातील वाहनधारकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. चिखली, वाकड, दिघी, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच दुचाकी वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहेत. याबाबत शुक्रवारी (दि. 30) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

चिखली परिसरातून दोन वाहने चोरीला गेली आहेत. त्यामध्ये शरद वसंतराव पालेकर (वय 42, रा. टॉवर लाइन चिखली) यांची 90 हजार रुपये किमतीची एम एच 14 / एच टी 2993 ही दुचाकी त्यांच्या घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार 28 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आला. तर दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये नितेश सदानंद सिंग (वय 29, रा. भोसरी) यांनी देखील चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादी नितेश यांची 10 हजार रुपये किमतीची एम एच 14 / ए एन 3856 ही दुचाकी त्यांनी सोनवणे वस्ती चिखली येथे एका कंपनीच्या गेटसमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 19 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास चिखली पोलीस करीत आहेत.

विकास दिनकर शेखर (वय 38, रा. काळेवाडी, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकास यांची 40 हजार रुपये किमतीची एम एच 14 / जी एक्स 9437 ही दुचाकी चोरून नेली आहे. विकास यांनी त्यांच्या दुचाकी 27 जानेवारी रोजी सकाळी सहाच्या सुमारास आदर्श नगर काळेवाडी येथील मराठी शाळेसमोर पार्क केली. त्यानंतर केवळ एक तासात त्यांची दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

नितीन मनोजकुमार पाटील (वय 19, रा. डुडुळगाव) यांनी दिघी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची एम एच 28 / बी एफ 7637 ही दुचाकी त्यांच्या घरासमोर लॉक करून पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 27 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

अभिजीत शशिकांत भोसले (वय 23, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिजित यांनी त्यांची 80 हजार रुपये किमतीची एम एच 14 / एच बी 9075 ही दुचाकी 6 जानेवारी रोजी सकाळी यशवंत नगर पिंपरी येथील एका गल्लीमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 7 जानेवारी रोजी उघडकीस आला. याबाबत 30 जानेवारी रोजी फिर्याद देण्यात आली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like