chikhali News : राज्यस्तरीय एअर रायफल स्पर्धेत चिखलीच्या राजनंदिनीचा अचूक ‘नेम’; राष्ट्रीय स्पर्धेत मिळविले स्थान

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र रायफल असोशिएशनच्या वतीने मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय एअर रायफल शूटींग स्पर्धेत चिखलीच्या राजनंदिनी यादव हिने 14 वर्षांखालील वयोगटात 10 मीटर प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करीत 400 पैकी 328  गुण मिळवीत राष्ट्रीय एअर रायफल शूटींग स्पर्धेत स्थान मिळविले. तिच्या या यशाचे चिखली परिसरात कौतुक होत आहे.

राजनंदिनी ही माजी नगरसेविका कै. अलका यादव यांची नात, तर चिखलातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव यांची कन्या. आकुर्डी येथील अरुण पाडुळे स्पोर्ट प्रमोशन फाउंडेशनच्या अविचर पिस्तूल व रायफल शूटींग क्लबच्या वतीने तिने राज्यस्तरीय एअर रायफल शूटींग सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील एकूण सात स्पर्धकांनी यश संपादन केले. यामध्ये राजनंदिनीचा समावेश होता.

राजनंदिनी ही निगडी येथील अमृतानंदमयी शाळेत इयत्ता सातवीत शिकत आहे. तिला लहानपणापासून नेमबाजीची आवड आहे. तसेच तिची आजी व माजी नगरसेविका कै. अलका यादव आणि कटुंबीयांचे भक्कम पाठबळ मिळाल्याने तिने शिक्षणासह नेमबाजीत यशस्वी कामगिरी केली आहे.

मुलींनी शिक्षणासह क्रीडा क्षेत्रातही नावलौकिक मिळवा, अशी अलका यादव यांची शिकवण होती. त्यानुसार राजनंदिनीने शिक्षणात 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळवीत नेमबाजीतही प्रगती साधली आहे.

राज्यस्तरीय एअर रायफल शूटींग स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविल्यामुळे चिखली परिसरातून राजनंदिनीचे विशेष कौतुक होत आहे. फ प्रभाग समितीचे अध्यक्ष कुंदन गायकवाड, नगरसेविका स्वीनल म्हेत्रे,  स्वीकृत सदस्य दिनेश यादव, टाटा मोटर्स युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने, शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी काशीद, भाजपचे युवा नेते पांडुरंग साने आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे.

राजनंदिनीला खेलो इंडिया खेलो, ऑलिम्पिकचा ध्यास…

राजनंदिनीने राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्यामुळे तिला अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. त्याही पुढे खेलो इंडिया खेलो, ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचा तिचा ध्यास आहे. त्यासाठी तिला कुटुंबीयांसह चिखली ग्रामस्थांकडून कायम प्रोत्साहन मिळत आहे. एक उत्कृष्ट महिला नेमबाज म्हणून तिने नाव कमवावे. तिच्या यशातून आमची वेगळी ओळख निर्माण व्हावी, एवढीच इच्छा असल्याची भावना राजनंदिनीचे वडील जितेंद्र यादव यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.