Chikhali : आदित्य आसबे यांस आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश

एमपीसी न्यूज – अमेरिका येथे दिनांक 16 मे ते 20 मे 2019 या कालावधीत झालेल्या ‘बहा एस ए ई कॅलिफोर्निया’ या वैशिष्ट्यपूर्ण वाहनांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आदित्य आसबे या विद्यार्थ्याला जागतिक स्तरावर द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले. तसेच त्याच्या समूहाने अभिनव संकल्पना वापरून साकार केलेल्या ‘टी एस आय 7.0’ या बहुउद्देशीय वाहनाला जागतिक स्तरावर दहावा क्रमांक मिळाला.

जगातील वेगवेगळ्या देशांतून सुमारे शंभर संघ या वैशिष्ट्यपूर्ण वाहन स्पर्धेत सहभागी झाले होते. निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेतून माध्यमिक आणि सिटी प्राईड शाळेतून उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन सध्या व्ही आय टी चेन्नई येथे बी.टेक.च्या दुसऱ्या वर्गात शिकत असलेला आदित्य आसबे हा विद्यार्थी चिखली येथील लघुउद्योजक दामाजी आसबे यांचा मुलगा आहे.

  • बहा एस ए ई कॅलिफोर्निया स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. यासाठी खाचखळगे, दगडगोटे, दलदल, तीनशे फुटांचे धोकेदायक वळण आणि एकशेदहा फुटांचा उभा चढ असलेला तीन किलोमीटरचा ट्रॅक असतो. त्यावर विविध निकष लावून वाहनांची चाचणी स्पर्धा घेण्यात येते. व्ही आय टी चेन्नई या महाविद्यालयातील टीम सक्षम इंटरनॅशनल या समूहात आदित्य आसबे, समीर अस्थाना, रिया यादव, रोहित मगदूम ( चालक ) हे विद्यार्थी विपणन विभागाचे प्रतिनिधित्व करीत असून समूहप्रमुख यशोवर्धन पटेल यांच्यासह एकूण वीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.

विशेष बाब म्हणजे, या टी एस आय ७.० या वाहननिर्मितीपासून ते स्पर्धेतील सहभागाचा आर्थिक भार या विद्यार्थ्यांनी स्वतः उचलला. तंत्रज्ञान, मजबुती, वेग, पर्वतारोहण, धक्के पचवण्याची क्षमता, विपणन कौशल्य अशा विविध निकषांवर अतिशय अटीतटीने झालेल्या या स्पर्धेत आदित्य आसबे याने वैयक्तिकरीत्या विपणन कौशल्य या निकषावर जागतिक पातळीवर द्वितीय क्रमांक मिळवला.

  • तर टीम सक्षम इंटरनॅशनल या त्याच्या गटाला जागतिक क्रमवारीत दहावे स्थान मिळाले. बहा ई टी एस या समूहाने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. आंतरराष्ट्रीय वाहन उद्योग क्षेत्रातील नामवंत कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत विजेत्यांना सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली.

याबाबत आदित्य आसबे म्हणाला, टी एस आय ७.० या बहुउद्देशीय वाहनास शासकीय परवाने मिळाल्यास कार रेसिंग, शेती उद्योग, संरक्षण खाते, दुर्गम डोंगराळ प्रदेश, नदी आणि समुद्रकिनारा अशा विविध ठिकाणी याचा उपयोग करता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.