Chikhali : फिर्याद देताना दोन गटात पोलीस चौकीत राडा; पोलिसांना धक्काबुक्की

एमपीसी न्यूज – रात्री पिलेल्या दारूचे पैसे देण्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करताना पोलीस चौकीतच दोन गट आपसांत भिडले. दोन्ही गटातील लोकांनी पोलिसांना देखील धक्काबुक्की केली. हा प्रकार आज (रविवारी) सकाळी दहाच्या सुमारास साने चौक पोलीस चौकी येथे घडला. पोलिसांनी याप्रकरणी दहा जणांना अटक केली आहे.

अमोल संजय पवार, आशिष ज्ञानेश्वर गवळी, सचिन बाळासाहेब येलकेवाढ, योगेश कैलास कदम, अनिल विठ्ठल खंडागळे, अरुण दौलत पवार, गोरख दशरथ डुकळे, सतीश किसान जाधव, अर्जुन दशरथ पिटेकर, संदीप भारत डुकळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कैलास गेनबा डुकळे आणि त्याचे साथीदार अद्याप फरार आहेत. पोलीस उपनिरीक्षक यु बी ओमासे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रात्री दारू पिण्यासाठी बसले. त्या दारूचे पैसे देण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण झाले. त्याबाबत ते साने चौक पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक यु बी ओमासे चौकीत होते. ओमासे आरोपींकडे त्यांच्या तक्रारीबाबत विचारपूस करीत होते. त्यावेळी दोन्ही तक्रारदारांच्या बाजूने 25 ते 30 लोक जमा झाले. पोलीस चौकीसमोर बेकायदेशीर जमाव जमवून आपसात एकमेकांना शिवीगाळ करू लागले. त्यानंतर दोन्ही गट आपसात भिडले आणि मारहाण करू लागले.

पोलीस चौकीबाहेर मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरु झाला. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक ओमासे यांनी आरोपींना समजावण्याच्या प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी ओमासे आणि त्यांच्या पोलीस कर्मचा-यांना देखील धक्काबुक्की केली. जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत आरोपींनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.