Chinchwad : पालकांनी मुलांशी विचारपूर्वक वागावे – डॉ. स्वाती भावे

एमपीसी न्यूज – जन्मानंतर पाचव्या-सहाव्या महिन्यांपासून मूल आपल्या आईला ओळखू लागते. पुढे मूल वर्षाचे झाले की त्याला आई-बाबा, कुटुंबातील व्यक्‍तींची ओळख होते. लहान मुलांमध्ये अनुकरण करण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांशी विचारपूर्वक वागले पाहिजे. मुलांचे वय, भावविश्व समजून घेऊन त्यांच्याशी योग्य वर्तन केले तर चांगले पालक होणे शक्य आहे, असे मत बालमानसोपचार तज्ज्ञ व एएसीसीआयच्या सदस्य डॉ. स्वाती भावे यांनी व्यक्‍त केले. 

असोसिएशन ऑफ अॅडल्टसंट ॲण्ड चाईल्ड केअर इन इंडिया आणि भोसरीतील वात्सल्य मदर ॲण्ड चाईल्ड केअरच्या वतीने शुकवारी (26 जूलै) चिंचवड, ऑटो क्लस्टर येथे ‘‘किशोरवयीन मुलांशी सुसंवाद आणि योग्य पालकत्व’’ या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. स्वाती भावे यांनी उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन केले. वात्सल्य मदर ॲण्ड चाईल्ड केअरचे संचालक डॉ. रोहिदास आल्हाट, डॉ. संदीप कवडे, डॉ. बागेश्री देवकर, डॉ. शंकर गोरे आदी उपस्थित होते.

डॉ. भावे म्हणाल्या की, मुलांमध्ये मोबाईलवर गेम खेळणे, सोशल मीडियाचा अति वापर हे एक प्रकारचे व्यसन झाले आहे. कुमारवयीन मुलांमध्ये धुम्रपान, मद्यपान करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा जीवघेण्या व्यवसनांपासून मूलांना दूर ठेवणे म्हणजे पालकांना आव्हान वाटते. अशा समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी पालकांनी विचारपूर्वक वागले पाहिजे. घरामध्ये टी.व्ही. पाहणे, मोबाईल हाताळणे अशा बाबींवर नियम करून त्याची अंमलबजावणी आई-बाबांनी काटेकोरपणे केली तर त्याचा सकारात्मक परिणाम मुलांवर होतो.

संपूर्ण कुटुंबामध्ये सुसंवाद असेल तर लहान मुलं, किशोरवयीन मुलं, आई-बाबा, आजी-आजोबा यांच्यामध्ये तणावाचे प्रसंग निर्माण होणार नाहीत. हल्ली पालक मुलांनी एखादी वस्तू मागितली की लगेच त्याची पूर्तता करतात. मागणी त्वरित पूर्ण होते, असे पाहिले की मुलांच्या अपेक्षा वाढतात. त्यापेक्षा पालकांनी मुलांना नकार ऐकण्याची सवय लावली पाहिजे. नकाराची सवय नसेल तर काही वेळेस मुलांकडून टोकाचे पाऊल उचलले जाण्याची शक्‍यता असते. त्यातून आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ज्या मुलांना नकार ऐकण्याची सवय आहे. ती आयुष्यात अधिक यशस्वी होतात, असे निरीक्षण समोर आले आहे, असे डॉ. भावे यांनी सांगितले.

भोसरी येथील वात्सल्य हॉस्पिटलच्या बाकी डॉक्टर यांनी विविध विषयांवर रोल प्ले सादर करून खऱ्या अर्थाने पालकत्व आणि संभाषण कसे असावे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील बालरोगतज्ज्ञ मोठया संख्येने उपस्थित होते. डॉ. संदीप कवडे यांनी मुलांशी बोलणे, मर्यादा, अपेक्षा, मदतीची पद्धत, चूक झाल्यास केली जाणारी शिक्षा, मुलांबरोबर पालकांची जवळीक, एखादा निर्णय घेताना त्यामध्ये मुलांशी चर्चा करणारे तसेच अती काळजी करणारे पालक,  मुलांबाबत गंभीर असणारे पालक, मुलांवर सारखे लक्ष ठेवणारे पालक या विषयी माहिती दिली.

डॉ. शंकर गोरे यांनी मुलांशी कशाप्रकारे संवाद साधावा, कसे बोलावे, मुलांना सामाजिक बांधिलकी, परिस्थिती याची कल्पना देत पालकांनी कशाप्रकारे वागावे, आपले अनुकरण मुलं कशी करतात, अडचणीमध्ये घरामध्ये शिकलेल्या बाबींचा कसा वापर करतात याबाबत माहिती सांगितली. घरामध्ये पालकांकडून केले जाणारे धूम्रपान, मद्यपान किवा कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना याचा मुलांवर विपरित परिणाम होतो. त्यातूनच अशी मुले आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही या न्यूनगंडातून अंमली पदार्थाचे सेवन, त्यातून चोरी करणे आणि पुढे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाटचाल करतात. यामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. समाजामध्ये अशा घटना सध्या वाढत आहेत. हे टाळण्यासाठी कुटुंबात सुसंवाद असला पाहिजे, असे डॉ. गोरे यांनी सांगितले.

तसेच मोबाईलचा अति वापर, जंक फुडचा आरोग्यावर होणारा परिणाम, मुलांशी संवाद साधणे या विविध विषयांवर छोटया-छोटया नाटयछटा सादर केल्या. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी उत्तरे दिली. प्रास्ताविक डॉ. रोहिदास आल्हाट यांनी केले.  स्वागत डॉ. शंकर गोरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संदीप कवडे यांनी केले. आभार डॉ. बागेश्री देवकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.