Pune Crime News: मूल होत नव्हते म्हणून चिमुरड्याचे अपहरण

पोलिसांच्या भीतीने पुन्हा आणून सोडले

एमपीसी न्यूज: हडपसर परिसरातून सोमवारी पहाटे एक वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. परंतु दोन दिवसानंतर अपहरणकर्त्यांनी पुन्हा त्या मुलाचे ज्या ठिकाणाहून अपहरण केले होते तिथेच परत आणून सोडले होते. पोलिसांनी याप्रकरणी दोन महिलांसह तिघांना अटक केली आहे. यातील एका महिलेला मूल होत नसल्यामुळे त्यांनी मुलाचे अपहरण केले होते. परंतु नंतर पोलीस आपल्याला पकडतील या ह्या भीतीने त्यांनी परत या मुलाला आणून सोडले. 

पंचशीला तपन्ना मेलीनकैरी (वय 33), वैशाली तुळशीराम सोनकांबळे (वय 41) आणि केरकनाथ नागनाथ सूर्यवंशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हडपसर पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शर्मिला काळे यांचा एक वर्षीय मुलगा कार्तिक काळे याचे अपहरण केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंचशीला तपन्ना मेलीनकैरी हिला लग्नाच्या 15 वर्षांनंतरही मुल होत नव्हते. त्यामुळे नवऱ्याने सोडून दिले होते. त्यामुळे तिला एकटेपणा जाणवत होता आणि मातृत्वाची ओढ लागली होती. सुरुवातीला त्यांनी अनाथ आश्रमातून मुलगा दत्तक घेण्यासाठी प्रयत्नही केले परंतु कोरोना काळात त्यांना हे शक्य झाले नाही. त्यामुळे तिने इतर दोन आरोपींशी चर्चा करून मूल पळवून आणण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी हडपसर परिसरातील गाडीतळ पुलाखालून त्या मुलाचे अपहरण केले होते.

परंतु नंतर हडपसर पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण आरोपींना लागली होती. त्यामुळे पोलिसांच्या भीतीने जर हे बाळ आपण पुन्हा नेऊन ठेवले तर पोलीस आपल्यावर कारवाई करणार नाही असा विचार करून त्यांनी पुन्हा जिथून त्याचे अपहरण केले होते तिथे परत नेऊन ठेवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.