Pune : दिव्यांग व अनाथ मुलांसाठी रविवारी बाल आनंद मेळावा 

केअर टेकर्स सोसायटीचा नवीन वर्षाचा अनोखा उपक्रम ; सुमारे १५ संस्थांचा सहभाग

एमपीसी न्यूज – अनाथ, दिव्यांग आणि समाजातील दुर्लक्षित मुलांना नवे वर्ष साजरे करण्याचा आनंद घेता यावा, यासाठी केअर टेकर्स सोसायटीच्या वतीने जिल्हास्तरीय बाल आनंद मेळावा २०२० चे आयोजन करण्यात आले आहे. धायरी, हिंगणे, उरूळीकांचन, कोरेगाव भिमा, लोणी काळभोर, वडगाव अशा विविध भागातील १५ सामाजिक संस्था व शाळेतील ५०० हून अधिक विद्यार्थी मेळाव्यात सहभागी होणार आहेत. बाबाजान चौकातील कॅम्प एज्युकेशन मुलांचे हायस्कूल येथे रविवारी (दि.5)सायंकाळी ५.३० वाजता हा आनंद मेळावा होणार आहे. आनंद मेळाव्याला विनामूल्य प्रवेश आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष कुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला सुफियान शेख, विष्णु दोशी, संजय असरकर, हर्षवर्धन बनसोडे, छब्बुअक्का जाधव, सुवर्णा शिराळे आदी उपस्थित होते.

आनंद मेळाव्याचे उद्घाटन माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर, अ‍ॅड.दिलीप काळे, ज्ञानेश पुरंदरे, निलेश भिसे, अश्विनी गायकवाड, अब्दुल गफ्फार शेख, अधिनाश खंडारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समाजातील वंचित मुलांसाठी संस्था गेली १५ वर्षे सातत्याने कार्यरत आहे.

कुमार शिंदे म्हणाले, समाजातील प्रत्येक व्यक्ती नव्या वर्षाचा आनंद साजरा करतो. परंतु समाजात अनेक अशा व्यक्ती आहेत ज्यांना हा आनंद घेता येत नाही. समाजातील अशा दुर्लक्षित घटकांनाही नव्या वर्षाचा आनंद घेता यावा, यासाठी संस्थेतर्फे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यामध्ये जम्पिंग जॅक, आगगाडी, घोडागाडी, बग्गी, बलुन फायरिंग, रिंग गेम, टॅटू अशा अनेक खेळाचा आनंद मुलांना घेता येणार आहे. यावेळी मुलांना नव्या वर्षानिमित्त शालेय साहित्य भेटवस्तू स्वरूपात देण्यात येणार आहे.

ज्ञानगंगोत्री मतिमंद मुलांची शाळा पावरीगाव, छत्रपती प्रतिष्ठान निवासी मतिमंद मुलांची शाळा हिंगणे खुर्द, निवासी मतिमंद मुलांची शाळा उरळीकांचन, वेदप्रकाश गोयल निवासी मतिमंद मुलांची शाळा, सेवाधाम मतिमंद विद्यालय कोरेगाव भिमा, महावीर निवासी मतिमंद विद्यालय लोणी काळभोर, जीवनधारा मतिमंद मुलांची शाळा रास्ता पेठ, तैयला ऑरफनेज (अनाथ मुलांची शाळा), गोपाळ देशपांडे वसतीगृह वडगाव मावळ, जो कीडस् क्लब, रिदम डान्स अकॅडमी, अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट (मूकबधिर मुलांची शाळा), ममता फाऊंडेशन, अपंग रोजगार उद्योग व तांत्रिक प्रशिक्षण केंद्र, लुई ब्रेल अंध मुलींचे वसतिगृह न-हे आंबेगाव या संस्थातील विशेष मुले आनंदमेळाव्यात सहभागी होणार आहेत. तरी पुणेकरांनी त्यांना प्रोत्साहित करण्याकरिता उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.