Pimpri : कविता आणि भक्तिरसात साहित्यिक झाले चिंब

एमपीसी न्यूज – वर्षाऋतू असला की कवींच्या प्रतिभेला नवे घुमारे येतात. निसर्ग आणि कवी यांचे जिवाभावाचे नाते असते. उंच उंच डोंगरावरील मेघात मेघ बनण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील साहित्यिक मावळ परिसरातील सह्याद्रीच्या रांगेतील निसर्गरम्य तुंग, तिकोना, लोहगडचा परिसर, पवना धरण, प्रतिपंढरपूर येथे जाऊन पावसाबरोबर साहित्यरसात चिंब भिजले.

प्रतिपंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सुरेश कंक यांनी “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी” हा तुकोबारायांचा अभंग सादर केला. ह.भ.प. प्रकाश घोरपडे यांनी “दारी तुळस हिरवीगार तेथे संतांचा संसार” हे भक्तिगीत पहाडी आवाजात म्हणून भक्तिमय वातावरण निर्मिती केली. कवयित्री माधुरी विधाटे यांनी “घोष पानाफुलातून विठू नामाचा नामाचा”  ही काव्यरचना म्हणत निसर्ग म्हणजेच ईश्वर असे सूचित केले. कवी यशवंत यांची “आई म्हणूनी कोणी आईस हाक मारी” ही कविता राजेंद्र घावटे यांनी म्हणून काव्यभक्ती मैफलीत रंगत आणली.

” पाहू द्या पाहू द्या माझ्या विठ्ठलाचे मुख” हा संत नामदेवांचा अभंग माधुरी ओक यांनी सादर केला. कवी निशिकांत गुमास्ते यांनीही  रचना सादर केली. विठ्ठलाचे दर्शन घेऊन निघाल्यावर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. तुम्हा सर्व साहित्यभक्तांचे मी स्वागत करीत आहे असेच जणू वरुणराजा म्हणत होता. सविता इंगळे, राधाबाई वाघमारे, रजनी अहेरराव, जयश्री घावटे,अश्विनी कुलकर्णी, मनीषा पाटील, उज्ज्वला केळकर, जयश्री गुमास्ते, मधुश्री ओव्हाळ, प्रज्ञा ओव्हाळ, सुधा पाटील या महिलांनी विविध निसर्गरम्य गीते गायली.  पवना धरण फक्त ४५ टक्के भरलेय हे डोळ्याने साहित्यिकांनी पाहिले अन् ‘पाणी बचत वर्षभर’ हा निर्धार केला. राज अहेरराव, शरद काणेकर, रमेश वाकनीस, प्रदीप गांधलीकर, कैलास भैरट, प्रा.तुकाराम पाटील, प्रथमेश जगदाळे यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.